तुळजापूर तालुक्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान 

घरावरील पत्रे उडून गेले, विजेचे खांब कोसळले, जनावरे मृत्युमुखी 
 

तुळजापूर -  दोन दिवसांत झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील टेलरनगर, येवती, गंधोरा, किलज व काक्रंबा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  विविध ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून  गेले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची  जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. 

 या नुकसानीची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी केली.नुकसानग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि जनावरे मृत्युमुखी पडलेल्या पशुधन मालकांना पूर्वपदावर येण्यासाठी तत्काळ मदत मिळण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी (तहसीलदार, महावितरण विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी) स्वतः जाऊन नुकसान झालेला नुकसानग्रस्त भागात एकही व्यक्ती मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून पंचनामे करावेत आणि तात्काळ मदत मिळण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करावा अशा सूचना खासदार ओमराजे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यासोबतच महावितरणच्या अधिकार्‍यांनी अवकाळी वाऱ्यामध्ये पडझड झालेले पोल आणि त्यामुळे विस्कळीत झालेली विद्युत व्यवस्था तात्काळ दुरुस्त करून अवकाळी वाऱ्यांचा प्रभाव असलेल्या संपूर्ण भागांमध्ये वीज व्यवस्था पूर्वपदावर सुरळीत करावी अशा सूचना त्यांनी  दिल्या.

याप्रसंगी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे , महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता गुजर , तालुका कृषी अधिकारी जाधव  यांच्यासह गावचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच-उपसरपंच यांच्यासह शेतकरी, नागरिक, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.