उस्मानाबादचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षीपासून सुरु होणार
उस्मानाबाद - उस्मानाबादचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम मान्यतेसाठी परिपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणत्याही परिस्थितीत उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय १०० टक्के सुरु होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे नूतन अधिष्ठाता डॉ. संजय राठोड दिली.
उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आत्यावश्यक व किचकट शस्त्रक्रिया, आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी संख्या अपुरी पडत होती. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात पाठविले जात होते. त्यामुळे या रुग्णालयाची रेफर रुग्णालय अशी ओळख निर्माण झाली होती. मात्र जिल्ह्यातील जनतेचा वाढता रेटा व लोकप्रतिनिधींच्या बऱ्याच प्रयत्नानंतर हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा उभा करण्याचे काम अंतिम टप्प्यात चालू आहे.
प्रथम वर्षासाठी ५० वैद्यकीय शिक्षक तर ३८ वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर नियुक्त करण्यात येणार आहेत. तर यासाठी १५०० हजार पुस्तके असलेले मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. याबरोबरच डॉक्टर, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्यासाठी स्वतंत्र निवासी वसतीगृह व इतर सर्व प्रकारची यंत्रणा २५ एकर क्षेत्रावर उभा करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हावासियांची वैद्यकीय महाविद्यालय केव्हा सुरू होणार ? अशी अशी लागून राहिलेली आस व प्रतिक्षा यामुळे संपली असून प्रत्यक्षात यावर्षी या महाविद्यालयाचा व वैद्यकीय सेवेचा लाभ जिल्हावासीयांना थेट घेता येणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेची परवानगी (LOP) मिळाल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. ते मिळविण्यासाठी व त्याची मानके पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी या परिषदेचे पथक जुलै अखेरपर्यंत अचानकपणे भेट देण्यासाठी केव्हाही येऊ शकते. मात्र प्रक्रिया व्यवस्थित व यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यात येत आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रयोगशाळा, शवविच्छेदन कक्ष, मनुष्य देह (अद्यावत), अद्यावत व्याख्यान कक्ष, ऑडिओ व व्हिडीओ व्हर्च्यूअल क्लासरुम तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही क्लासरुम वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न करुन तशी चर्चा घडवून आणावी लागते. तर प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शरीर रचना, क्रिया, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषध शास्त्र, न्यायवैद्यक शास्त्र असे विभाग तयार करण्यात येणार आहेत. यासाठी ३०० बेडचे रुग्णालय असणे आवश्यक असून त्यापैकी ६० टक्के बेड दररोज २४ तास रुग्णांनी भरलेले असणे आवश्यक आहे. तर तपासणी करण्यासाठी ओपीडीतील रुग्णांची संख्या दररोज कमीत कमी १००० ते १२०० असणे आवश्यक आहे.
जिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी दि.१ एप्रिलपासून ताब्यात घेऊन तीचे नूतनीकरण केले आहे. यामध्ये फर्निचर व उपकरणे अद्याप आलेली नाहीत. ती उपलब्ध झाल्यानंतर बसविण्यात येणार आहेत. तसेच इमारतीच्या आतमधील काही किरकोळ बदल करण्यात येत आहेत.
यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील आ.कैलास पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एच. वडगावे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच या महाविद्यालयाच्या अनेक अडचणींचा खडतर प्रवास सहज सुकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ९०६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ४ वर्षासाठी ही रक्कम वापरता येणार आहे. यामध्ये डॉक्टर कर्मचारी यांचे वेतन व बांधकाम याचा समावेश करण्यात आला आहे.