सेवानिवृत्तीनंतरच्या लाभासाठी एसटी कर्मचार्‍याची महामंडळाकडून फरफट !

न्यायाच्या मागणीसाठी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर बहुजन रिपब्लिकन सेनेचे बेमुदत धरणे आंदोलन
 

उस्मानाबाद -पावणेदोन वर्षापूर्वी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असल्याने सेवानिवृत्ती घेतलेल्या कळंब आगारातील एसटी कामगाराची महामंडळाकडून फरफट होत आहे. अपघातामुळे पायाचे ऑपरेशन झाल्यानंतर वैद्यकीय खर्चासाठी पैसे नसल्याने कर्मचार्‍याची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे निवृत्तीपश्चात लाभाची रक्कम तात्काळ मिळावी याकरिता बहुजन रिपब्लिकन सेनेचे संस्थापक शंकरदादा काळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष वसंतदादा देडे यांच्या नेतृत्वात संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उस्मानाबाद येथील विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर बुधवार, 20 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे. या  निवेदनात म्हटले आहे की, कळंब आगारात टायर फिटर काम करणारे कर्मचारी राजाभाऊ आदिनाथ जाधव हे एका अपघातामध्ये पायाला दुखापत झाल्यामुळे ऑपरेशन करुन पायात रॉड टाकण्यात आलेला आहे. वैद्यकीयदृष्टया अपात्र (मेडिकल अनफिट) असल्याच्या कारणाने 30/9/2020 रोजी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणार्‍या आर्थिक लाभाच्या रकमेतून पुढील वैद्यकीय उपचार करता येतील या भावनेतून त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. परंतु त्यांना अद्याप एक रुपयाचा देखील लाभ मिळालेला नाही. वास्तविक सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांना पेन्शन व कराराच्या फरकाचे 45 हजार रुपये रोख व त्यावरील व्या तसेच पुढील सेवेसाठी मिळणारे 10 लाख रुपये अद्याप मिळालेले नाहीत. सेवानिवृत्तीपश्चात मिळणार्‍या लाभाची रक्कम मिळावी याकरिता वारंवार विभागीय नियंत्रक कार्यालयाकडे पाठपुरावा करुन देखील दखल घेतली जात नसल्यामुळे राजाभाऊ जाधव यांनी बहुजन रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतदादा देडे यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

त्यानंतर श्री. देडे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत विभागीय नियंत्रक यांना 04 जुलै रोजी निवेदन देऊन कर्मचारी राजाभाऊ जाधव यांना सेवानिवृत्तीपश्चातचे लाभ तात्काळ देण्यात यावे किंवा त्यांची सेवानिवृत्ती नामंजूर करुन विकलांग कर्मचार्‍याला हलकी कामे देऊन रुजू करावे. तसेच दरम्यानच्या काळातील वेतन अदा करावे, अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु विभागीय नियंत्रकांनी कोणतेही उत्तर न दिल्यामुळे बहुजन रिपब्लिकन सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतदादा देडे, जिल्हाध्यक्ष सुभाष थोरात, पुणे जिल्हाध्यक्ष रंजनाताई हजारे, महिला जिल्हाध्यक्ष राजूबाई जाधव, संपर्कप्रमुख पवन डोंगरे, कळंब तालुकाध्यक्ष शिवाजी थोरात आणि अन्यायग्रस्त कर्मचारी राजाभाऊ जाधव हे सहभागी झाले आहेत.