इंम्पिरिकल डाटा न्यायालयात दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार !
उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्यातील ओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थेतील इंम्पिरिकल डाटा न्यायालयात दाखल करण्यात यावेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू शकणार नाही. आरक्षणात ओबीसींवर होणारा अन्याय न रोखल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आज (दि.19) मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यात म्हटले आहे की, मध्यप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात राज्यातील ओबीसी आरक्षण टिकविले आहे. त्यासाठी त्यांनी इम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगामार्फत ओबीसी लोकसंख्या नेमकी किती, ही लोकसंख्या आकडेवारी नुसार निश्चित करण्यातसाठी ग्रामपंचायत, नगर पालिका, जिल्हा परिषद,महानगर पालिका मधील मतदार याद्या घेवून ओबीसी मतदारांचा वास्तव जवळ जाणारा आकडा संकलित केला. सन 2009 व 2014 मधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडून आलेले ओबीसी लोकप्रतिनिधी यांचा डाटा गोळा ओला त्याच प्रमाणे ओबीसी व राखीव खुल्या जागेवर निवडून गेलेल्या सदस्यांची माहिती एकत्रित केली. ग्रामपंचायतस्तरावर अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील माहितीपूर्ण इम्पिरिकल डाटा गोळा केला.
अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण वगळून 50 टक्के मर्यादेत ओबीसी आरक्षण देताना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीना किती टक्के आरक्षण मिळेल हे देखील सादर करावे. ही आमची उस्मानाबाद जिल्हयातील सर्व ओबीसी बांधवाची मागणी आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी न्यायालयात माहितीपूर्ण इम्पिरिकल डाटा ओबीसी समाजाच्या संदर्भात सादर करावा व महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाला 50 टक्के मर्यादा घालून ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण टिकवून समाजावर होणारा अन्याय थांबवावा. अन्यथा ओबीसी समाज स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे प्रमुख सल्लागार पांडुरंग लाटे, अॅड.खंडेराव चौरे, पिराजी मंजुळे, मार्गदर्शक दत्तात्रय बंडगर, अध्यक्ष लक्ष्मण माने, सचिव रवी कोरे, कार्याध्यक्ष महादेव माळी, संघटक सतीश कदम, कोषाध्यक्ष इंद्रजित देवकते, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके, आनंद कंदले (तुळजापूर), माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, वैभव हंचाटे, यांच्यासह मुकेश नायगावकर, सतीश लोंढे, नीलेश साळुंके, मुन्ना सुरवसे आदींची स्वाक्षरी आहे.