श्रीक्षेत्र तुळजापूर वैश्विक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने शिष्टमंडळाची  तिरुमला तिरूपती देवस्थानला भेट

 

उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने विकास प्रक्रियेला गती मिळत आहे. तिरुपती येथे दरवर्षी साधारण 2.5 ते 3 कोटी भाविक येत असतात त्याच धर्तीवर पुढील 5 वर्षात तुळजापूर येथे दरवर्षी 2.5 कोटी भाविकांचे उद्दिष्ट ठेवून अनुषंगिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर विकासाबाबत तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अधिकाऱ्यांसोबत, महंत, पुजारी, सल्लागार यांचे शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा केली. 

यामध्ये प्रामुख्याने भाविकांच्या सोयी सुविधा, दर्शन पास व्यवस्था, सर्व सामान्य भाविक भक्तांना त्रास न होता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची करण्यात येत असलेली दर्शन व्यवस्था, भाविकांचा प्रसाद, जागेचे केलेले सुशोभिकरण व सौंदर्यीकरण, उभारण्यात आलेली कृत्रिम शिल्प, सुरक्षा व्यवस्था, वाहन व्यवस्था, भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांच्या सामानाची हाताळणी व्यवस्था तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.  

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दरवर्षी जवळपास 80 लाख भाविक येतात. पुढील 5 वर्षात ही संख्या 2.5 कोटी पर्यंत नेण्याचा प्रयत्न असून यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने नियोजन सुरू आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदीर संस्थान व प्रशासनाशी संबंधित अधिकारी, महंत, सल्लागार समितीचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, पुजारी मंडळाचे प्रतिनिधी यांचा शिष्टमंडळात समावेश असून देवस्थान व परिसराच्या पाहणीसह तिरूमला तिरूपती देवस्थानच्या संपूर्ण व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेण्यात येत आहे. 

आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने जी उर्जा मिळते, ती द्विगुणित करण्यासाठी भाविकांना उत्कृष्ट सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पूर्वीप्रमाणेच भाविकांनी शहरात किमान दोन-तीन दिवस मुक्काम करावा व येथील अर्थकारणाला बळकटी मिळावी यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण शहर व परिसर विकसित करण्याचा मानस आहे. 

शिष्टमंडळात आ. राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता, अतिरिक्त जिल्हाधिकारी .शिवाजी शिंदे, उप विभागीय अधिकारी तथा तुळजापूर संस्थान सदस्य डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार श्रीमती योगिता कोल्हे, उप विभागीय पोलिस अधिकारी श्रीमती सई भोरे पाटील, तुळजाभवानी संस्थानचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, नगर परिषद अभियंता प्रशांत चव्हाण, स्ट्रकटवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट, मुंबईचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी .केदार काटकर, महंत .तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा ,भोपे पुजारी मंडळाचे सुधीर कदम, पालकर पुजारी मंडळाचे नागेश साळुंखे, उपाध्य पुजारी मंडळाचे .अनंत कोंडो आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल .रवी भागवत यांचा समावेश आहे.