उस्मानाबादेत इंग्रजी शाळेकडून कोरोना काळातील फीसची मागणी

मुलांची टीसी मिळवण्यासाठी विधवा महिलेची जिल्हाधिकार्‍यांकडे धाव !
 
कोरोनाने पतीचे निधन, उत्पन्नाचे साधनही नसल्याने महिला हतबल

उस्मानाबाद -कोरोनाकाळात पतीचे निधन झाले.. कुटुंबाचा भार एकटीवर पडला..  शिकणार्‍या दोन मुलांचा इंग्रजी शाळेचा खर्च परवडत नसल्यामुळे उस्मानाबादच्या ग्रीनलॅन्ड शाळेत चकरा मारणार्‍या महिलेला शाळेच्या व्यवस्थापनाने दाद दिली नाही. त्यामुळे मुलांची टीसी मिळवून द्यावी म्हणून तुळजापूर तालुक्यातील कसई येथील विधवा महिलेने जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली आहे.

कसई (ता.तुळजापूर) येथील सुरेखा अणू घोंगते या महिलेने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले की, त्यांचे पती अणू घोंगते यांचे कोरोनाने 2 मे 2021 रोजी निधन झाले.  पतीच्या निधनामुळे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. अशा परिस्थितीत पाचवीमध्ये शिकणारी मुलगी पूजा आणि चौथीमध्ये शिकणारा शुभम या दोन्ही मुलांची टीसी मिळावी म्हणून उस्मानाबाद येथील ग्रीनलॅन्ड इंग्लिश स्कूलमध्ये हेलपाटे मारत आहे. परंतु तुमच्याकडे शाळेची दोन लाख रुपये थकबाकी आहे, असे सांगून अरेरावीची भाषा करत टीसी देण्यास नकार देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

वास्तविक कोरोना काळात दोन्ही मुले शाळेत गेलीच नाहीत. तरीही शाळेकडून विधवा स्त्रीला टीसी देण्यास टाळाटाळ करुन त्रास दिला जात असून जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोन्ही मुलांची टीसी देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करुन मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी घोंगते यांनी केली आहे.