नामांतराचा मुद्दा पुढे करुन हिंदू-मुस्लिम द्वेष पसरविण्याचे कारस्थान

शहराची नामांतरे करुन सरकार काय साध्य करणार आहे ?
 
समाजवादी पार्टीचे अबु आझमी यांचा सरकारला सवाल

उस्मानाबाद - देशात हिंदू-मुस्लिम भाईचारा संपुष्टात आणून द्वेष पसरविण्याचे काम देश आणि महाराष्ट्रातील सरकार करत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न देशासमोर असताना नामांतराचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल सरकार करत आहे. शहराचे नामांतर करुन सरकारला काय साध्य करायचे आहे? असा सवाल समाजवादी पार्टीचे नेते  आमदार अबु आझमी यांनी केला. लवकरच नामांतर विरोधी कृती समितीच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


उस्मानाबाद येथे आज (दि.23) शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नामांतराच्या विषयावर भूमिका मांडली. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख सरचिटणीस परवेज सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस अनिस अहमद, उस्मानाबादचे माजी नगरसेवक खलील सय्यद, मुस्लिम नेते मसूद शेख उपस्थित होते.

अबु आझमी म्हणाले की, गंगा-जमुनी तहजीबवर चालणार्‍या देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम रहावे हीच आमची भूमिका आहे. हिंदू धर्माचा आम्ही आदर करतो. परंतु देशातील भाजपा सरकार केवळ धर्माचे राजकारण करुन जनतेत द्वेष पसरविण्याचे काम करत आहे. आता औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शहराची नावे बदलून विकास होणार आहे का? उलट नामांतरासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणारा निधी सरकार इतर विकासकामांसाठी वापरता येऊ शकते.

सध्या देशावर 136 कोटीच्या कर्जाचा डोंगर उभारलेला आहे. त्यामुळे देशात जन्माला येणारे मूलही 35-40 हजाराचे कर्ज डोक्यावर घेऊनच जन्माला येत आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरण्याची भीती आहे. धर्माच्या नावावर राजनीती करणार्‍या सरकारने वेळीच लक्ष नाही दिले तर आगामी काळात भारताची अवस्था श्रीलंकेप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही, असेही आझमी म्हणाले.


मीर निजाम उस्मानअली यांचे मोठे कार्य
उस्मानाबाद शहराला ज्यांचे नाव आहे त्या मीर निजाम उस्मानअली यांचे कार्य मोठे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शिक्षणासाठी विद्यापीठाची स्थापना केली. याच विद्यापीठात देशाचे माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंह राव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या महान व्यक्तींनी शिक्षण घेतले. भारत-चीन युद्धाच्या वेळी देश संकटात असताना स्वतःकडील सहा टन सोने त्यांनी देशासाठी दिले. त्यांच्या नावाला विरोध करण्याचे कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


आगामी निवडणुकासंदर्भात लवकरच रणनीती ठरवणार
देशात भाजपाला टक्कर देऊ शकणारी काँग्रेस आता कमकुवत झालेली आहे. त्यामुळे आता समाजवादी पार्टीचा पर्याय जनतेसमोर आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी जनतेला पर्याय घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यासाठी आगमी रणनीती लवकरच ठरविण्यात येईल. उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक दिग्गज नेते समाजवादी पार्टीत लवकरच प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फेाटही अबु आझमी यांनी पत्रकार परिषदेत केला.


नामांतरविरोधी कृती समितीच्या बैठकीस संबोधन
अबु आझमी यांचे शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी यांच्या दर्ग्यात चादर अर्पण केल्यानंतर त्यांनी नामांतर विरोधीकृती समितीच्या बैठकीस संबोधीत केले. शहरातील विविध क्षेत्रातील जनतेची नामांतरासह राजकीय विषयांवर मते जाणून घेतली.