शहापूरमधील जनता दरबारात आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून तलाठ्यांची कानउघडणी  

 

शहापूर -  तुळजापूर तालुक्यातील २५  शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे खिचपत पडला होता. अखेर शेतकऱ्यांनी अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला चार लाख निधी जमा करून रस्ताची जागा विकत घेतली, पण त्याची नोंद सात बारा उताऱ्यावर  घेण्यासाठी स्थानिक तलाठी अडवणूक करीत होता. याबद्दल शेतकऱ्यांनी  आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या जनता दरबारात लेखी तक्रार करताच, त्यांनी तलाठ्यांची चांगलीच कानउघडणी करून तहसीलदारांना याबाबत नोंद करून घेण्याचे निर्देश दिले. 


ग्रामीण भागात शेतीची व इतर शासकीय अनेक कामे रखडलेली असतात,  नागरिकांना छोट्या छोट्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते,  त्या वेळीच सोडवण्यासाठी आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या  "जनता दरबार" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी शेतकऱ्यांचे पिक विमा, विद्युत पुरवठा,शेत रस्ते, तलाठी व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून होणारी कामे, विविध शासकीय योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, ग्राम सडक योजना, या संदर्भातील लेखी तक्रारी अर्ज घेण्यात आले.

शहापूरमधील  एकूण पंचवीस शेतकऱ्यांनी  संयुक्तपणे आडवणुक झालेला शेतरस्ता  जवळपास चार लाख मोबदला देऊन खरेदी केला आहे.सदरचा शेत रस्ता सातबारा फेरफार वरती नोंदणी साठी गेल्या वर्षी तलाठी यांच्याकडे  अर्ज केला आहे.मात्र  तलाठ्याने 20 हजार लाचेची मागणी केली. लाच न दिल्याने बिनबुडाचे कारणे सांगून फेरफार नोंद केली जात नव्हती. सदरील प्रकरण सर्व संदर्भित कार्यालयातून बंद करून तो रस्ता विकत घेतल्याने कोणताही अडथळा नाही. तरीही नोंदणी घेतली जात नव्हती. याबाबत त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आ राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करून आपले गाऱ्हाणे मांडले. 

यावेळी आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी तलाठी प्रवीण जमादार  यांना जाब विचारताच त्यांची पाचवर धरण बसली. यावेळी आ. राणा पाटील यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांना याप्रकरणी लक्ष घालून त्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची नोंद घेण्याचे निर्देश दिले.