स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांनी हर घर तिरंगा या उपक्रमात सहभाग घ्यावा

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन
 

उस्मानाबाद - देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासठी नागरिकांनी आपल्या घरांवर, आस्थापनांवर आणि दुकानांवर तिरंगा लावून तसेच या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत श्री.दिवेगावकर बोलत होते.यावेळी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या संचालक प्रांजल शिंदे, उपजिल्हाधिकारी(सा.प्र) अविनाश कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डी के पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हालकुडे,तहसीलदार गणेश माळी, आदी उपस्थित होते.

          अनेक ठिकाणी वा-याने झेंडे खाली पडतात . तिरंग्याचा अवमान होऊ नये यासाठी शहरी भागात नगर परिषद आणि नगर पंचायतींनी तसेच जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात एक टीम आणि नोडल अधिकारी नियुक्त करून झेंड्यांचा अवमान होणार नाही यासाठी जबाबदार अधिकारी,कर्मचा-यांची नियुक्ती करावी. नगर परिषदेने शहरातील अनाधिकृत झेंडे, फलक आणि होर्डिंग हटवाव्यात. शहरात स्वच्छता मोहीम राबवावी कुठेही घाण दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी.तसेच आजादी का अमृत महोत्सव साजरा करतांना शहरात स्वच्छता आणि रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही संबंधित विभागांना श्री.दिवेगावकर यांनी सूचना केल्या.

यावेळी हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागांना त्यांच्या जबाबदाराऱ्यांचे वाटप करण्यात आले. संबधित आधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, तसेच याप्रसंगी कुठल्याही प्रकारचा शिष्टाचार भंग होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे असेही श्री.दिवेगावकर म्हणाले.

कार्यक्रम स्थळी नागरिकांच्या आसनाची व्यवस्थित सुविधा असावी,परिसर स्वच्छ आणि सॅनेटाईझ करण्याची जबाबदारी नगर परिषदेची असेल.लाऊड स्पीकर, जनरेटर आणि शामियाना लावण्याबाबत कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तर विद्युत मंडळाने त्यादिवशी वीज पुरवठा सुरळीत राहील याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.सर्व सन्माननीय सदस्यांना वेळेवर निमंत्रण पत्रिका मिळतील, याची काळजी घ्यावी.तसेच कार्यक्रमस्थळी आरोग्य पथक आणि रुग्णवाहिका तत्पर असणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी .दिवेगांवकर यांनी यावेळी सांगितले. “हरघर तिरंगा” हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व अधिका-यांनी प्रयत्ने करावीत.असेही श्री.दिवेगावकर यांनी यावेळी आवाहन केले.