लोक अदालत तडजोडीने वाद मिटविण्याचे प्रभावी माध्यम - प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे
उस्मानाबाद - लोक अदालत हे आपले वाद तडजोडीने मिटविण्याचे प्रभावी माध्यम असून सर्वोच्च न्यायालयाने जनसामान्यांसाठी केलेला अतिशय लाभदाय उपक्रम आहे. आपण जे न्यायालयात कागदावरील वाद बघतो आणि कागदवर जे निर्णय घेतो त्यापेक्षा आपापसात वाद तडजोडीने काढून आपले निर्णय आपण स्वत: घ्यावे आणि वाटाघाटीतून मार्ग काढून एक पाऊल पुढे-एक पाऊल मागे असा मोठेपणा सगळ्यांनी घ्यावा. खटले चालू ठेवून आपला खर्च, वेळ आणि शक्ती वाया घालवू नये.त्यापेक्षा लोक अदालतीच्या माध्यमातून सामंज्यस्याने आपले वाद मिटवावेत असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू एस.शेंडे यांनी केले.
येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या राष्ट्रीय लोक अदालत या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी न्यायाधीश शेंडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 आर.एस.गुप्ता, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.घेटे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य एम.एस.पाटील, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस.आर.मुंढे, द न्य इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि.चे उपमहाप्रबंधक रुद्राशिष रॉय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव आदी उपस्थित होते.
पक्षकारांना लोक अदालतीमध्ये येऊन आपले वाद मिटविण्याची संधी मिळावी यासाठी बार कौन्सिल आणि विधीज्ञ मंडळ यांनी प्रयत्न करावेत. समाजात वाद विवाद निर्माण होत असतात, परंतु हे वाद न्यायिक पध्दतीने सोडविण्यासाठी महा लोकअदालतीचे आयोजन अत्यंत स्तुत्य आणि लाभदायक आहे, असेही यावेळी श्रीमती शेंडे म्हणाल्या.
ही राष्ट्रीय लोक अदालत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशावरुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि विधीज्ञ मंडळ उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपसथितीत द न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.तर्फे एक कोटी 33 हजार 811 आणि 54 लाख 35 हजार रुपयांचे धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे,मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे,जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाची प्रकरणे,धनादेशाची प्रकरणे असे एकूण 7694 प्रकरणे ठेवण्यात आले होते. आत्तापर्यंत यापैकी 1146 प्रकरणे निकाली निघाली आहेत आणि 22 कोटी 14 लाख 61 हजार एवढी रक्कम पक्षकारांना मिळणार आहे.तसेच 20 हजार 248 दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी 1704 प्रकरणे निकाली निघली आहेत व एक कोटी 86 लाख 13 हजार 334 रुपये एवढी रक्कम पक्षकारांना मिळणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज रात्री उशीरा पर्यंत सुरु आहे आणि अजुनही काही तालुक्यांची माहिती येणे बाकी आहे अशी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी दिली.
यावेळी सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, महिला व पुरुष पक्षकार, विविध विमा कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी, विविध पतसंस्था, पोलिस, नगर परिषद, ग्राम पंचायत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व विधीज्ञ मंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.