उस्मानाबादला  विकसित जिल्हा करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार : डॉ.भागवत कराड

 

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हयाची आकांक्षित जिल्हा असल्याची ओळख पुसून विकसित व जिल्हा करण्याच्या उद्देश्याने सर्व यंत्रणांनी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य, जलसंधारण, शिक्षण आणि कृषी क्षेत्रास केंद्र सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  “आकांक्षित जिल्हा कार्यक्रम” अंतर्गत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, दिल्ली येथील  निती आयोगाचे वरिष्ठ सल्लागार रामा कामकाजू ,शिक्षणाधिकारी माध्यमिक गजानन सुसर , वरिष्ठ भूवैज्ञनिक एल.जी. गायकवाड, सी.के कलसेट्टी,  सी. आर. राऊत ,  आर. एन. ठोंबरे,  जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक एन. बी. जावळीकर , डॉ. डी. के. ललीत,  उप कार्यकारी अभियंता ए.एन. जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच, निपाणीकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  एम.डी. तिर्थकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक,  ग्राम विकास प्रकल्पाच्या संचालक प्राजंल शिंदे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अर्जून नाडगौडा ,  महावितरणचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव,पशुसंवर्धन  अधिकारी सुनिल पगारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी. के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे ,  डॉ. शिवकुमार धनकुटे, डॉ . कुलदिप मिटकरी, आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर, जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . गुप्ता यांनी डॉ.कराड यांना जिल्ह्यातील आरोग्य, जलसंधारण, शिक्षण आणि कृषी तसेच केंद पुरस्कृत योजनांबाबत माहिती दिली.

          डॉ.कराड म्हणाले की , महिला आणि बालकांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील मुलींचे शिक्षण आणि आरोग्याबाबत जिल्हा परिषद आणि प्रशासनाने आरोग्य यंत्रणेकडून काम करून घ्यावे. जिल्ह्यातील महिलांमध्ये ॲनीमिया आणि बालकांमधील कुपोषणावर नियंत्रण आण्ण्यासाठी उपययोजना कराव्यात .यासाठी प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला खासगी डॉक्टरांची मोफत सेवा उपलब्ध करून द्यावी.जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानावर आरोग्य यत्रंणेने आळा घालण्यासाठी जनजागृती करावी. लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय बांधण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सकांनी प्रस्ताव पाठवावा.तसेच जिल्हा रुग्णालयास 236 खाटानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षात कोव्हिडमुळे रुग्णालयाचा विस्तार झाला आहे. आणि आणखी 400 खाटा वाढविण्यात आल्याने अधिक वैद्यकीय स्टाफ मागणीसाठीही प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्याचे निर्देशही डॉ. कराड यांनी यावेळी दिले.

ग्रामीन भागात जलसंधारणांची कामे आणि जल जीवन मिशन या योजनेची प्रभावी अंमल बजावणी करण्याबाबत डॉ.कराड यांनी सूचना दिल्या.ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि विहीत मुदतीत पूर्ण करा.पाण्याचे चांगले स्त्रोत असेल त्या ठिकाणी वॉटर ग्रिड तयार करावेत.पाण्याचे सुनियोजित व्यवस्थापन केल्याने शेतकरी आणि नागरिकांना कायमचा दिलासा होईल. उस्मानाबाद जिल्ह्याने जलसंधारणांची कामे अतिशय चांगली केली आहेत.आता पाणी व्यवस्थापनाला आधुनिकतेची जोड द्या  त्यामुळे नागरिक आणि शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होईल असेही ते यावेळी म्हणाले.

श्री.दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील कौशल्य विकास आणि आर्थिक समावेशनाबाबत माहिती दिली . उस्मानाबाद जिल्हा डोमेन विशिष्ट डेल्टा रॅंकिंग मध्ये राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. मुद्रा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेनशन योजना आणि प्रधान मंत्री जनधन योजनेबाबत जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती सांगितली. जिल्ह्यातील 99.42 टक्के घरांना वीज,54.59 टक्के ग्रांपंचायतींना इंटरनेट चा सेवा देण्यात येत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील मंजूर असलेली  कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहे.तसेच जिल्ह्याती सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकास विभागाकडून देण्यात आलेल्या प्रशिक्षण आणि त्यात मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी रोजगार निर्मितीबाबत केल्या जाणा-या प्रयत्नांबाबत माहिती दिली.

          नीती आयोगाच्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्हा शिक्षण क्षेत्रात देशात अग्रगण्य आहे. येथील शिक्षण व्यवस्थेला  अधिक दर्जेदार करण्यासाठी मुलींना उच्च शिक्षण देण्याचुआ अनुषंगाने शिक्षण विभागाने पावले उचलावीत.असेही डॉ. कराड म्हणाले. यावेळी श्री.गुप्ता यांनी जिल्ह्यातील 1400 वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि 636 नवीन वर्ग खोल्या बांधण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील शाळांमध्ये मिनी सायंस सेंटर, वर्चुवल लर्निंग क्लासरूम, बाला(BALA the happy school project), इनोव्हेटीव सायंस सेंटर्स,ॲस्ट्रोनॉमी क्लब इत्यादी सुविधा सुरु करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यात मुलींच्या साक्षरता दरात वाढ करण्यासाठी साक्षर भारत अभियान राबविण्यात येत आहे.जिल्ह्याचा साक्षरता दर 78.44 टक्के आहे. यामध्ये मुलांचे दर 85.84 टक्के इतका असून मुलींचा साक्षरता दर 70.51 टक्के आहे. महिलांमध्ये साक्षरता वाढवण्यासाठि शिक्षण विभागाकडून जागरुकतापर अभियान आणि घरोघरी जाऊन प्रबोधन केला जात असल्याचेही श्री .गुप्ता यावेळी म्हणाले. मुलींसाठी शाळांमध्ये स्वच्छता गृह आणि सॅनेटरी नॅपकिनही उपलब्ध करून देण्यात येत आहे,तसेच पिण्याचे पाणी आणि इतर पायाभूत सुविधाही देण्यात येत आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी डॉ. कराड यांनी कोव्हिड लसीकरणाचाही संक्षिप्त आढावा घेतला. लसीकरणामुळे आपण कोरोनाशी दोन हात करू शकलो,तेंव्हा जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर द्यावा अशी सूचनाही त्यांनी दिली.