राज ठाकरे यांच्यावरील गुन्हा रद्द करुन मनसैनिकांची मुस्कटदाबी करणार्‍यावर कारवाई करा

उस्मानाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यपालांना निवेदन
 

उस्मानाबाद - औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी  नियमबाह्य अटी लादून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भोंग्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आवाज उठविणार्‍या मनसैनिकांची मुस्कटदाबी करणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या गृह खात्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेेचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांमार्फत आज (दि.5) हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की,  नियमबाह्य पध्दतीने अटी टाकून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद  येथील सभेला परवानगी देण्यात आली. त्यानंतर अटींचा भंग केला म्हणून ठाकरे यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यात यावा. तसेच सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, मस्जिदीवरील विनापरवाना भोंगे काढण्यात यावे. आणि भोंग्याबाबत आवाजाच्या मर्यादेचे पालन करा म्हणणार्‍या मनसैनिकांना पोलीस प्रशासनावर दबाव टाकून त्यांची मुस्कटदाबी करणार्‍या आघाडी सरकारच्या गृहखात्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, महाराष्ट्र सैनिक अजय तनमोर, कृष्णा माणकेश्वरे, यांची स्वाक्षरी आहे.