अणदूर मध्ये स्वस्त धान्य दुकानदारांचा काळाबाजार

तुळजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी मूग गळून गप्प
 

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे गेल्या वर्षभरापासून काही स्वस्त धान्य दुकानदार गहू ,तांदूळ , साखर याचा काळाबाजार करून शासनाची  फसवणूक करत आहेत तर गोरगरिबांचा अन्नाचा घास हिरावून घेत आहेत, मात्र याकडे तुळजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून दोघांचे साटेलोटे आहे की काय ? अशी शंका येत आहे.

स्वस्त धान्य दुकानात भाव फलक, शासकीय योजनेची माहिती, तक्रार नोंद वही असणे आवश्यक असतानाही  गावातील कोणत्याही  स्वस्त धान्य दुकानात नियमांचे पालन केले जात नाही, शिधापत्रिका धारकांना पावती दिली जात नाही, बायोमेट्रिक केले जाते मात्र त्यांच्या नावावर नंतर परस्पर बोगस पावत्या करून फसवणूक केली जात आहे. तूर डाळ आणि तेलाची पिशवी कधीच वितरित केली जात नाही, याकडे तुळजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांचे  दुर्लक्ष होत आहे, आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांना दरमहा हप्ता देतो,  त्यामुळे आमचे कुणी  वाकडे करू शकत नाही , अशी मुजोर भाषा स्वस्त धान्य दुकानदार बोलत आहेत.

स्वस्त धान्य दुकानाची दरमहा तपासणी होणे आवश्यक असतानाही कधीच तपासणी केली जात नाही, पाकीट मिळाले की पुरवठा अधिकारी गळून गप बसत आहेत.जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही  करण्याची मागणी होत आहे.

अणदूर गावात स्वस्त धान्य दुकानात आलेल्या गव्हाचा काळाबाजार करणाऱ्या एका तथाकथित पुढाऱ्यांने गावाचा लीडर झाल्यानंतर लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला होता.  त्यावेळी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी रेड देखील केली होती, पण पुढे काय झाले याचे किस्से आजही मोठ्या चवीने चर्चेले जात आहेत.