उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास आणखी एक दणका 

सांजा रोडवरील २० गुंठे भूखंड प्रकरणी १८ मे रोजी सुनावणी 
 
शासनाच्या फसवणूक प्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची तक्रार 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघातील आणखी एका गैरव्यवहाराची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारकडे सोपवली असून, येत्या १८ मे रोजी सकाळी ११ वाजता पहिली सुनावणी होणार आहे.

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघात सध्या काही मूठभर पत्रकार उरले आहेत. अध्यक्ष आणि सचिव यांनी मनमानी करून अनेक गैरव्यवहार केले आहेत. या पत्रकार संघाच्या मालकीची आंबेडकर पुतळ्याजवळ इमारत असताना, सन १९९६ - ९७ दरम्यान वाढीव बांधकाम करण्यासाठी शासनाकडे निधी मागितला आणि आलेल्या दोन लाख निधीतून सांजा रोडवर २० गुंठे जमीन घेतली होती. नंतर काही वर्षानंतर भूखंड आणि इमारत नसल्याचे दाखवून आकाशवाणीसमोर सहा गुंठे शासकीय भूखंड लाटला होता. त्यानंतर सांजा रोडवरील २० गुंठे भूखंड कवडीमोल भावात विकून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न काही ज्येष्ठ पत्रकारांनी हाणून  पाडला होता. 


उस्मानाबाद आकाशवाणी समोरील सहा गुंठे शासकीय भूखंड प्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी तक्रार दाखल करून हा भूखंड शासनजमा केला होता. त्यानंतर सुभेदार यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सांजा रोडवरील २० गुंठे भूखंड प्रकरणी दि. १८ एप्रिल २०२२ रोजी आणखी एक तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी येत्या १८ मे रोजी सकाळी ११ वाजता पहिली सुनावणी होणार आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, सन १९९६ मध्ये उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने आंबेडकर पुतळ्याजवळील इमारतीचे वाढीव बांधकाम करायचे कारण सांगून शासनाकडून दहा लाख रुपये निधी मंजूर केला , त्यापैकी दोन लाख निधी आल्यानंतर वाढीव बांधकाम करण्याऐवजी सांजा रोडवर २० गुंठे भूखंड खरेदी केला, निधीचा दुरुपयोग केला. आज २५ वर्षे झाली तरी त्या जागेवर बांधकाम केले नाही, शासनास विनियोग प्रमाणपत्र दाखल केले नाही, तसेच अनेक वेळा भूखंड विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहाराची  चौकशी करून शासनाने हा भूखंड परत घ्यावा तसेच दोषी पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी सुभेदार यांची मागणी आहे. 

कार्यकारीणी बरखास्त करा...  

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची न्यास नोंदणी कार्यालयात अद्याप नोंदणी नाही, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेला हा पत्रकार संघ संलग्न आहे. या संघाने मराठी पत्रकार परिषदेशी देखील गद्दारी केलेली आहे. अनेक वर्षे झाली वार्षिक सर्वसाधारण सभा नाही. अध्यक्ष, सचिव इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी करीत आहेत. 

 या संघाचे गेले अनेक वर्षे ऑडीट झालेले नाही. पत्रकार संघाची दुकाने ज्यांनी वापरली ते भाडे बँक खात्यावर जमा करीत  नाहीत . या पत्रकार संघाची एक खोली असून ही खोली वापरणाऱ्यानी देखील भाडे भरलेले नाही. सगळा अंधाधुंद कारभार सुरु असून, मराठी पत्रकार परिषदेने या  पत्रकार संघाची विद्यमान कार्यकारिणी  बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी काही पत्रकारांनी  केली आहे.

काय आहे तक्रार ?