नगरसेवक ,आमदार, खासदार यांच्या मानधनातील 50 टक्के  रक्कम कोरोना फंडात जमा करावी

  -ॲड रेवण भोसले
 

उस्मानाबाद -  कोरोनामुळे जागतिक महामंदी आली असून त्याचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे मार्च 2020 पासून आजपर्यंत राज्यातील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांना मिळणाऱ्या मानधनाच्या रकमेतील 50 टक्के  रक्कम  कोरोना फंडात जमा करण्याचे आदेश देण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे  प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 खरोखरच आपण जनतेचे सेवक आहोत असे जर या सर्वांना वाटत असेल तर कोरोना फंडात त्यांच्या मानधनातील 50 टक्के जमा केलेल्या रकमेमधून महाराष्ट्रातील गोरगरीब  रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी निश्चितच फायदा होईल तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या लसीकरणासही वेग येईल .

   कोरोना महामारीने महाराष्ट्रात थैमान घातले असून तो घराबाहेर दबा धरून बसलेला असतानाही रस्त्यावर पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी, गावोगावी फिरून माहिती गोळा करणारे ग्रामसेवक, महसूल कर्मचारी, नगरपरिषद, नगरपंचायत, महापालिकेतील अधिकारी, जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणारे अधिकारी, हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय असो की नाले सफाई करून साथीजन्य रोग टाळण्यासाठी लढणारे सफाई कामगार असो, ते सर्वजण कोरोना संकटकाळात अहोरात्र परिश्रम घेत आहेत .या सर्व घटकांचा महाराष्ट्र शासनाने गौरव करून त्यांना कोरोना काळात अधिक मानधन द्यावे अशी मागणीही ॲड भोसले यांनी केली आहे.