धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग शहरासाठी 402 कोटी मंजूर
धाराशिव जिल्ह्यातील चार पालिकांना राज्य शासनाने 530 कोटी 85 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. धाराशिव, कळंब, वाशी, तुळजापूर व नळदुर्ग शहरातील रस्ते विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एवढा मोठा निधी उपलब्ध झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने धाराशिव, नळदुर्ग व तुळजापूरसाठी तब्बल 402 कोटी रुपयांचा निधी देऊन आपल्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्याबद्दल आमदार पाटील यांनी आभारही मानले.
शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था व वाढीव वस्त्यांमधील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने आमदर राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव, कळंब, वाशी, तुळजापूर व नळदुर्ग शहरातील रस्ते विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिल्या होत्या. धाराशिव येथे 16 एप्रिल तर 29 एप्रिलला कळंब येथे पत्रकार परिषद घेवून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्याबाबतची माहिती सर्व नागरिकांना दिली होती. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्ग, तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्प, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, नवीन भक्ती महामार्ग असे महत्वपूर्ण प्रकल्प धाराशिव जिल्ह्याच्या पदरात टाकणाल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठी भेट जिल्ह्याला दिली आहे. जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा नगर पालिकेसाठी तब्बल 530 कोटी रुपयांचा भरीव विकास निधी मंजूर केला आहे.
धाराशिव शहरातील रस्ते व नाली बांधकामासाठी 154 कोटी रुपयांचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. तुळजापूर शहरासाठी 173 कोटीचा व नळदुर्गसाठी 104 कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत राज्यस्तरीय प्रकल्प समितीची आज नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सानिया शेट्टी यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस उपसचिव श्रीकांत आंडगे, आयुक्त तथा संचालक नगर विकास प्रशासन संचालनालय डॉ.किरण कुलकर्णी उपस्थित होते. बैठकीत धाराशिवकरिता 146.66 कोटी, तुळजापूरसाठी 158 कोटी तर नळदुर्गसाठी 97.67 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. वाशी नगर पंचायत आणि कळंब नगर पालिकेसाठीही लवकरच भरीव तरतूद केली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
शहर विकासाच्या इतर मुद्यांवर संबंधित शहरातील नागरिकांकडून त्यांच्या सूचना व संकल्पना मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन आमदर राणाजगजितसिंह पाटील यांनी यापूर्वी केले आहे. नागरिकांच्या गरजा व शहर विकासाच्या त्यांच्या संकल्पना विचारात घेऊन परिपूर्ण आराखडा बनविण्यात येणार आहे. नागरिकांनी दिलेल्या महत्वपूर्ण सूचनांच्या अनुषंगाने महिनाअखेर संबंधित शहरामध्ये आमदर राणाजगजितसिंह पाटील आणि संबंधित पालिकेचे मुख्याधिकारी नागरिकांच्या उपस्थितीत व्यापक बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहर विकासाच्या आराखड्यामध्ये उद्यान विकसित करणे, स्वच्छतागृहे, घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, भुयारी गटार, पाणी पुरवठा या कामांबाबत सविस्तर चर्चा करून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली आहे.
मंजूर निधीपैकी एकट्या तुळजापूर मतदारसंघाला 47 टक्के
जिल्ह्यातील धाराशिव, उमरगा, तुळजापूर आणि नळदुर्ग या चार पालिकांना 530 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील तुळजापूर व नळदुर्ग पालिकेच्या वाट्याला 255.67 कोटी म्हणजे मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी टक्के एवढा मोठा निधी मंजूर झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यामाध्यमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचे काम केले आहे.