तुळजाभवानी मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या ११ पुजाऱ्यांना दणका
तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या ११ पुजाऱ्यांवर एक ते तीन महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप तक्रार क्रमांकावर आलेल्या तक्रारी तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून मंदिर तुळजाभवानी संस्थानच्या वतीने या कारवाया करण्यात आल्या आहेत.त्यामुळे येथील तुळजाभवानी मंदिरात गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास निजामकाळापासून बंदी असतानाही बळजबरीने आत जाणे, सुरक्षा रक्षकाला मारहाण करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे, अशा प्रकारे बेशिस्त वर्तन करून श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ पुजाऱ्यांवर जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशावरून एक ते तीन महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
यांच्यावर करण्यात आली कारवाई
- संकेत अनिल शिंदे ३ महिने
- ओंकार लक्ष्मीकांत भिसे ३ महिने
- वेदकुमार पेंदे ३ महिने
- स्वप्निल दत्ता भोसले ३ महिने
- अक्षय कदम भैये १ महिना
- अनिकेत अनिल शिंदे १ महिना
- ओंकार राजेश खुंटाफळे ३ महिने
- संकेत किरण पाटील १ महिना
- विवेक चिमाजी साळुंके ३ महिने
- अभिषेक राजकुमार पाटील १ महिना
- पंकज भाऊसाहेब कदम १ महिना
गाभाऱ्यात प्रवेश केल्याप्रकरणी स्वप्निल दत्ता भोसले व ओंकार राजेश खुंटाफळे या दोघांवर देऊळ कवायत कलम-३६ नुसार कारवाई करण्यात आली आहे. तर भाविकांची घुसखोरी, सुरक्षा रक्षकांसोबत गैरवर्तनासाठी ३ महिने मंदिर बंदची कारवाई तर मंदिरात फोटो काढण्यासारख्या प्रकरणात महिनाभर मंदिर बंदची कारवाई करण्यात आल्याचे मंदिर संस्थानने कळवले आहे.
.तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील गैरप्रकाराविरोधात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी कठोर धोरण स्विकारले असून गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तुळजाभवानी मंदिरात तैनात सुरक्षा रक्षकांचा सुपरवायझरच्या अहवालासोबतच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करण्यात येत आहे. मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या ११ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने मागील आठ दिवसात एक ते तीन महिने मंदिर बंदची कारवाई केली आहे. तसेच ‘आपणास सहा महिने मंदिर बंद का करण्यात येऊ नये’, अशा आशयाचा नोटीसा संबंधीतांना बजावण्यात आल्या आहेत.