त्रिकुटाचा दलाली हाच खरा धंदा / नैराश्यातून केलेले आरोप हास्यास्पद - मल्हार पाटील
उस्मानाबाद - त्रिकुटाचा दलाली हाच खरा धंदा असून त्रिकुटाने नैराश्यातून केलेले आरोप हास्यास्पद आहेत. ज्यांच्या रक्तातच गद्दारी, टक्केवारी, भ्रष्टाचार आहे; चोरी, हप्तेखोरी ज्यांचा इतिहास आहे, अशा कमिशनखोर त्रिकुटा कडून हेच शब्द अपेक्षित आहेत, असा पलटवार युवा नेते मल्हार पाटील यांनी केला आहे.
पीक विमा प्रकरणी आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचे प्रयत्न फसल्या नंतर कमिशनखोर त्रिकुटांनी उद्विग्नतेतून पत्रकार परिषद घेत मुख्य मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केविलवाणी खाटाटोप केली आहे. ' उचलली जीभ लावली टाळ्याला. ' जिल्ह्यातील जनता अतिशय सुज्ञ असून अशा भूलथापांना बळी पडणार नाही. राणा दादांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, नियोजनबद्ध कार्यपद्धती, अभ्यासू वृत्ती व मुद्देसूद मांडणी यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यात यश लाभले आहे.
विमा कंपनीलाच पैसे द्यावे लागावेत, एकतर्फी स्टे (स्थगिती आदेश) मिळू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हीएट दाखल करण्यात राणादादा व्यस्त होते आणि हे इकडे त्यांची बदनामी कशी करायची याची व्युहरचना करण्यात दंग होते. हा विचारधारा, संस्कार व संस्कृती मधील फरक आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य होते, आहे, व राहील. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही मल्हार पाटील यांनी म्हटले आहे.