फुलवाडी टोल नाक्यावर परिसरातील वाहन चालकांची लूट

अणदूर - अणदूरपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलवाडी टोल नाक्यावर परिसरातील वाहन चालकांची लूट सुरु आहे. दहा किलोमीटरच्या आतील चार चाकी वाहनांना टोल घेऊ नये, असा नियम असताना, दमदाटी करून टोल वसूल केला जात आहे. या टोल नाक्याशी मालकांचे हितसंबंध गुंतल्याने या ठिकाणी कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढली आहे.
अणदूर ते होर्टी या दहा ते पंधरा किलो मीटरचे रस्त्याचे काम अपूर्ण असताना तसेच अणदूरचा उड्डाण पूल कार्यांन्वित झाला नसताना, सर्व नियम धाब्यावर बसवून फुलवाडी टोल नाका सुरु करण्यात आला. अणदूर ते फुलवाडी टोल नका हे अंतर फक्त साडेपाच किलोमीटर आहे. तसेच नळदुर्ग ते टोल नाका हे अंतर साडेआठ ते नऊ किलोमीटरअसताना अणदूर आणि नळदुर्गच्या चार चाकी वाहनांना सोलापूरला जाताना ५० रुपये आणि येताना ३० रुपये टोल घेतला जात आहे.
अणदूर ते सोलापूर हे अंतर ४० किलोमीटर आहे. अणदूरचा दैनंदिन संबंध सोलापूर शहराशी जोडलेला आहे. खरेदीसाठी किंवा आजारी लोकांच्या उपचारासाठी सोलापूरला जावे लागते,एक तर दर महिन्याला २७५ रुपयाचा पास घ्या नाही तर जाताना ५० रुपये आणि येताना ३० रुपये टोल द्या, म्हणून दमदाटी करून टोल वसूल केला जात आहे.
अणदूर उड्डाण पुलाचे काम रखडले
अणदूर हे जवळपास २५ ते ३० हजार लोकवस्तीचे गाव आहे. अणदूरच्या उड्डाण पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरु आहे. सध्या हे काम बंद आहे. उड्डाण पूलाचे काम रखडल्यामुळे जवाहर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थाना जाताना तसेच या परिसरातील लोकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
अणदूर ते होर्टी या दहा ते पंधरा किलोमीटरच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. हे काम सध्या बंद आहे. तसेच चिवरी पाटीजवळ पाण्याचा निचरा होत नाही. तसेच या ठिकाणी सर्व्हिस रोड नाही, त्यामुळे येथे अनेक अपघात होत आहेत.
टोल नाक्यावर शौचालय नाही
टोल नाक्यावर शौचालय , मुतारी तसेच पाण्याची सोय नाही. येथे कामावर असलेले कर्मचारी मालकाच्या जीवावर दमदाटी करून अरेरावी करीत आहेत. तसेच या ठिकाणी अनेक वेळा फास्ट ट्रॅक स्कॅन होत नसल्याने वाहनाच्या रांगा लागत आहेत.
मालकांचे हितसंबंध
फुलवाडी टोल नाक्यात मालकाचे हितसंबंध गुंतले आहेत. मालकांची एक अँब्युलन्स, एक क्रेन तसेच काही वाहने या टोल नाक्यावर कार्यरत असल्याने दरमहा मोठी कमाई होत आहे. तसेच तुळजापूरच्या एका पुढाऱ्याशी हातमिळवणी करून या टोल नाक्याला मजूर पुरवण्याचे टेंडरही घेण्यात आले आहे. कंपनी मजुरांना जे पेमेंट देते, त्याच्या निम्माच पगार देऊन बाकीची रक्कम खिशात घातली जात आहे.
या टोल नाक्याविरुद्ध कुणी आवाज उठविला तर त्याला पोलिसाना सांगून खोट्या केसेस केल्या जात आहेत, त्यामुळे अणदूर - नळदुर्ग परिसरातील वाहन चालक तोंड दाबून बुक्काचा मार सहन करीत आहेत.
काय सांगतो नियम ?