कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागात अनेक कुटुंबांनी शेतात संसार थाटला 

 
कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागात अनेक कुटुंबांनी शेतात संसार थाटला

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे.  जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५८६३  झाली आहे. गेल्या पाच दिवसात ८७ जणांचा बळी गेला असून, दररोज किमान २० जणांचा मृत्यू होत आहे. 


शहरांसोबत आता ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. यामुळे भीतीने गावातील अनेक कुटुंबांनी आपले बस्तान आता शेतात हलवण्यास प्रारंभ केला आहे. अनेक कुटुंबांचे स्थलांतर शेतात झाल्याने आता गावे ओस पडत आहेत. मोठे चिरेबंदी वाडे, टोलेजंग इमारतींनाही कुलुप लागत आहे. 


गावात कोरोना आलाय, तरीबी लोकांची गर्दी हटना झालीय, आमचं तर झालं गेलं आता लेकरा - बाळाचा जीव वाचिवण्यासाठी गावातल्या मोठ्या घराला कुलूप लावून शेतात येऊन राहायची वेळ आलीय, अशी व्यथा बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथील काशीबाई वाघे (६९) यांनी सांगितली. आपली दोन मुले, सुना, पाच नातवंडांच्या कुटुंबासह त्या शेतात वास्तव्य करण्यासाठी आल्या आहेत.


सद्यस्थितीत दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. सुरुवातीला शहरानंतर आता ग्रामीण भागातही याचा फैलाव झपाट्याने होत आहे. सर्व रुग्णालये फुल्ल झाली आहेत. रुग्णांना बेड मिळवणेही कठीण होत आहे.

बेंबळीतील काशिबाई यांनाही कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे चिंता वाटत आहे. लहान मुले घरात न बसता खेळण्यासाठी बाहेर जातात. तसेच काहीना काही कामासाठी घरातील कोणाचा तरी बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क येतोच. हा प्रकार टाळण्यासाठी कुटुंबाचे प्राणच सर्वस्व मानून त्यांनी शेतात राहण्याचा पर्याय निवडला आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या गल्लीतील पाच कुटुंबेही आपआपल्या शेतात राहण्यासाठी गेली आहेत.


ग्रामीण भागात पुर्वीप्रमाणे कंटेन्मेंट झोन तयार करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता दुपटीने वाढली आहे. प्रशासनाने ग्रामीण नागरिकांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. अद्यापही गावातील गर्दी हटण्यासाठी तयार नाही. रुग्ण निघाल्यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी गतवर्षीप्रमाणे अापले बस्तान शेतात हलवले आहे.


 का वाढत आहे रुग्णसंख्या ? 

विनाकारण रस्त्यावर फिरणे, मास्क न वापरणे,सोशल डिस्टेंसिंग न ठेवणे , घरी आल्यानंतर हात न धुणे यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाची लक्षणे दिसू  लागल्यानंतर  बहुतांश जण होम क्वारंटाईन होत आहेत. त्यामुळे त्याचा संसर्ग घरातील अन्य लोकांना होत आहे. तसेच सर्दी, ताप , अंगदुखी सुरु झाल्यानंतर अनेकजण वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला न घेता  मेडिकल मधून गोळ्या आणून घरीच उपचार घेत आहेत. 

मागील वर्षी कोरोनाचा रुग्ण आढळला की , त्यास आरोग्य कर्मचारी उचलून नेवून दवाखान्यात नेत  होते, तसेच त्यास कोव्हीड सेंटर मध्ये ठेवले जात होते. त्यामुळे घरातील आणि परिसरातील लोकांना संसर्ग होत नव्हता. तसेच तो भाग सील केला जात होता. यंदा तसे होताना दिसत नाही. खूपच त्रास सुरु झाल्यानंतर काही जण दवाखान्यात भरती होत आहेत. भरती झाल्यानंतर अनेकांचा  २४ ते ४८ तासात  मृत्यू झाला आहे. 

इतर जिल्ह्याच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमिडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे.  उमरगा, तुळजापूर, परांडा या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी तर अनेक दिवसांपासून पुरवठाच होत नाही. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथेही गरजेच्या ५०% पण पुरवठा होत नाही. जिल्हा रुग्णालय आवारातील ऑक्सीजन प्लांट काही महिन्यांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित असताना काल कसे बसे याचे काम पूर्ण झाले. जिल्हाभरात डॉक्टरांचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना ऍडमिट करून घेण्यासाठी बेड शिल्लक नाहीत अशी आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था झालेली आहे. रुग्ण सापडल्यानंतर त्या परिसरात मायक्रो कंन्टेन्टमेन्ट झोन तयार करणे, संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि विलीगीकरण करणे व इतर अनुषंगिक गोष्टी समाधानकारकरीत्या होताना दिसत नाहीत.

From around the web