कळंब : निवृत्त एसटी वाहकचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी

 
कळंब : निवृत्त एसटी वाहकचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी


कळंब - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत अंतिम निकालात सेवानिवृत्त एसटी वाहकाच्या मुलाने राज्यात दुसरा आणि मागास प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. कळंब तालुक्यातील बोर्डा येथील डॉ. रवींद्र आपदेव शेळके यांनी हे घवघवीत यश मिळविले. घरची बेताची परिस्थिती असतानाही सुरवातीला एमबीबीएस आणि आता थेट उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

डॉ. रवींद्र यांचे वडील आपदेव शेळके हे एसटीत वाहक पदावरून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांना मिळणाऱ्या वेतनातून कसेबसे घर चालायचे. अशावेळी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणे त्यांच्यासाठी जिकिरीचे होते. मात्र, रवींद्र यांनी सुरवातीपासूनच शिक्षणानेच परिस्थिती सुधारू शकते, ही खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यानुसार परिश्रम करीत दहावी, बारावी व नंतर एमबीबीएस होण्यापर्यंत मजल मारली. बोर्डा येथे प्राथमिक, तर कळंबच्याच सावित्रीबाई फुले विद्यालयामध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. त्यासाठी त्यांनी शैक्षणिक कर्ज काढले होते. अधिकारी होण्याचे स्वप्न कायमच होते. पण घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नोकरी तर करावीच लागणार होती. त्यामुळे त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. कर्ज फेडल्यानंतर त्यांनी थेट नोकरीचा राजीनामा दिला व स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली. पूर्णवेळ परीक्षेचा अभ्यास केला आणि दीड-दोन वर्षांतच वर्ग-एकचे पद पटकावले.

आता ध्येय यूपीएससीचे
सुरवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अधिकारी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, तिथे वेळ जात आहे हे लक्षात आल्यानंतर राज्यसेवा परीक्षा देण्याचे निश्‍चित केले. उपजिल्हाधिकारी हे ध्येय पूर्ण झाले असले तरी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येथून पुढचा प्रवास ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी करणार असल्याचे डॉ. शेळके यांनी  सांगितले.

From around the web