पोलीस पाटील यांना मारहाण झाल्यास कलम 353 अन्वये गुन्हा दाखल होणार 

गाव पातळीवरील सरकारी कर्मचारी म्हणून ओळख
 
पोलीस पाटील यांना मारहाण झाल्यास कलम 353 अन्वये गुन्हा दाखल होणार

उस्मानाबाद - राज्यातील पोलीस पाटील यांच्या बाबतीत गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस पाटील यांना कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संबंधिताविरुद्ध भा,द,वि कलम 353 अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या बाबतचा अध्यादेश 3 मार्च रोजी निघाला आहे.

पोलीस पाटील संघटनाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 डिसेंबर 2020 रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला गाव कामगार पोलीस पाटील संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. बहुतांश विषय मार्गी लावण्याचे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिले.

पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. अशा परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यास संबंधिताविरुद्ध भा,द,वि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश गृह विभागाचे पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना 3 मार्च रोजी दिले आहेत.

या निर्णयामुळे पोलीस पाटील यांनी समाधान व्यक्त करून या निर्णयाचे गाव कामगार पोलीस पाटील संघाचे प्रदेश संघटक दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, जिल्हा सरचिटणीस धनंजय गुंड, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील यांनी स्वागत केले आहे.

From around the web