पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्याही स्थगित
उस्मानाबाद पोलीस दलात बदल्यांचा घोळ सुरूच

उस्मानाबाद पोलीस दलात बदल्यांचा घोळ सुरूच आहे. १३ पोलिसांच्या बदल्या रद्द करण्यात आल्यानंतर आता पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्याही स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील आठ पोलिसांच्या नियुक्त्याही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक नीवा जैन यांची नागपुराला बदली झाली आहे. जाता -जाता त्यांनी बदल्यांचा धडाका लावला होता. त्यांनी मागील तारीख ( बॅक डेट ) टाकून १३ पोलिसांच्या बदल्या काही दिवसापूर्वी केल्या होत्या, त्याची तक्रार थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यापर्यंत जाताच या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाठोपाठ आता ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्याही स्थगित करण्यात आल्या आहेत. या बदल्या का करण्यात आल्या आणि का रद्द करण्यात आल्या ? याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
उस्मानाबाद पोलीस दलातील १३ पोलिसांच्या बदल्या काही दिवसांतच रद्द
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील चार पोलिसांच्या बदल्या तर आठ पोलिसांच्या नियुक्त्याही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या नियुक्त्या 'अर्थपूर्ण ' व्यवहार करून करण्यात आल्याने त्या रद्द कराव्यात, अशी मागणी होत आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या आठ पैकी दोघांची खातेनिहाय चौकशी सुरु असताना, त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती का म्हणून देण्यात आली ,हे एक कोडेच आहे.