मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या

आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
 
s

औरंगाबाद- गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने मराठवाड्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.29) राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

         आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यात मागील दोन दिवसात मुसळधार पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमूग आदी पिके नामशेष झाली आहेत. तर कपाशी, मका, उस, मोसंबी, बाजरीची पिके आडवी झाली आहेत. शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून पिके पिवळी पडत आहेत. नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने शेतकर्‍यांची पिके वाहून गेली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकर्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच शेतीचे अर्थचक्र मोडले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे सलग दुसर्‍या वर्षी देखील खरीप हंगाम हातातून निसटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात जवळपास 21 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचेच पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नवीन नुकसानीचे पंचनामे कधी होणार?, अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. त्यामुळे पंचनामे न करता शासनाने मराठवाड्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

From around the web