धाराशिव : सन २०२० चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी होणार जमा

धाराशिव - खरीप २०२० पीकविम्यापोटी लाभार्थी शेतकरी बांधवांच्या याद्या व चेक बँकेत जमा करण्यात आले असून गुरुवारी प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
खरीप २०२० पीकविमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, प्राप्त रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. कळंब व तुळजापूर वगळता इतर तालुका कृषी अधिकारी यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या व चेक बँकेत जमा केले आहेत. कळंब व तुळजापूरच्या याद्या देखील आज तयार झाल्या असून गुरुवारी सकाळी बँकेत जमा होतील.
सोमवार पासूनच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते, मात्र काही प्रशासकीय अडचणीमुळे उशिराने याद्या व चेक बँकेकडे प्राप्त झाले, त्यामुळे वितरण सुरु होऊ शकले नाही. आज व उद्या सुट्टी असल्याने गुरुवार पासून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
या टप्यात जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ५९७ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रु.३४७७ प्रमाणे रु.९९.६२ कोटी विमा वितरित करण्यात येत आहे. त्याचबरोबर विमा कंपनीने पूर्वी मंजूर केलेल्या मात्र वितरित न केलेल्या २० हजार २२७ शेतकऱ्यांना रु.१९.७७ कोटी असे एकूण रु.११९.३९ कोटी वितरित करण्यात येत आहेत असे आ. पाटील यांनी सांगितले.