सेक्सटॉर्शनपासून  सावध राहण्याचे पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन

 
Osmanabad police

उस्मानाबाद  - ब्लॅकमेल करुन खंडणी उकळण्याचा ‘सेक्सटॉर्शन’ हा नवीन प्रकार सामाजिक प्रसार माध्यमांच्या अविवेकी वापरामुळे उदयास आला आहे. या प्रकारात अज्ञात स्त्री- पुरुष हे खंडणी उकळण्याकरीता नवनवीन सावज शोधण्यासाठी ऑनलाईन सामाजिक प्रसार माध्यमांचा उपयोग करतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप यांसारख्या मेसेजींग ॲप, डेटींग ॲप यांसारख्या सामाजिक प्रसार माध्यमांत खोटे नाव, पत्ते, छायाचित्रे वापरून आपले बनावट खाते (प्रोफाईल) उघडून आपण उच्च पदस्थ, श्रीमंत, देखणे, सुंदर असल्याचा बनाव करतात. अशा बनावट खात्यांद्वारे फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून, मिस कॉल देउन, व्हीडीओ कॉल करुन किंवा डेटींग ॲपद्वारे प्रेम, विवाह, संभोग असे भुरळ घालणारे प्रस्ताव इतरांना पाठवून त्यांची मैत्री संपादन करतात.

या मैत्रीतूनच पुढे अर्धनग्न, नग्न अवस्थेत एकमेकांना व्हीडीओ कॉल, चॅटींग केले जाते. बनावट खातेधारक असे अर्धनग्न, नग्न व्हीडीओ कॉल- छायाचित्रे, अश्लील संभाषन-संदेशांची देवान जतन (रेकॉर्ड) करुन ठेवतात. कालांतराने त्याच रेकॉर्डीगच्या आधारे ते व्हीडीओ कॉल, छायाचित्रे, चॅटींग अशी खाजगी माहिती इंटरनेटवर जगजाहिर करण्याची धमकी समोरील व्यक्तीस देउन ब्लॅकमेल करतात आणि त्याच्याकडून ऑनलाईन खंडणी उकळतात.

दुसऱ्या प्रकारात ऑनलाईन अश्लील साहित्य दाखवणाऱ्या संकेतस्थळांचे (वेबसाइट)सदस्य असणारे ग्राहक आपली नावे, बॅक खाते विषयक माहिती तेथे भरतात. “तुम्ही अश्लील व्हीडीओ पाहत असुन तुमचा सर्व बायोडाटा आमच्याकडे आहे.” अशी ऑनलाईन धमकी ते अज्ञात लोक ग्राहकांना देउन त्यांच्याकडून ऑनलाईन खंडणी उकळतात. आपली बदनामी टाळण्याच्या भीतीने पिडीत व्यक्ती समोरील त्या अज्ञाताच्या धमक्यांस बळी पडून खंडणी देतात किंवा प्रसंगी आत्महत्याही करतात.

“सेक्सटॉर्शन पासून सुरक्षीत रहायचे असेल तर कोणत्याही ज्ञात- अज्ञात व्यक्तीशी अश्लील चॅटींग करु नका. आपली अर्धनग्न, नग्न छायाचित्रे एकमेकांस पाठवू नका. अर्धनग्न, नग्न अवस्थेत व्हीडीओ कॉल करु नका. तसेच आपली खाजगी छायाचित्रे, व्हीडीओ हे मोबाईल फोन, मेमरीकार्ड, ऑनलाईन ड्राईव्ह यांत जतन करतांना अधीकृत ॲपचा वापर करुन मजबूत पासवर्डचा उपयोग करावा. अविश्वसनिय, संशयास्पद असणारे ॲपलिकेशन्स मोबाईल मध्ये घेउ नका. सामाजिक प्रसार माध्यमांचा मर्यादीत व सुरक्षीत वापर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्सटॉर्शनच्या धमक्यांना बळी न पडता नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.” असे आवाहन  पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी जनतेस केले आहे.

From around the web