सालेगावात  शेतकऱ्याचा खून

 

लोहारा -  तालुक्यातील सालेगाव येथे शेतात रात्री कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सालेगाव येथील गोविंद करदोरे (४२) यांनी ३ एकरात कांद्याची लागवड केली आहे.ते आपल्या आईसोबत कांद्याला पाणी देण्यासाठी शुक्रवारी रात्री मुक्कामासाठी शेतात गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी गोविंद यांच्या डोक्यात घातक हत्याराने वार करून हत्या केली. शनिवारी (दि. ३) पहाटे साडेपाचच्या सुमारास गोविंद यांचा मृतदेह विहिरीलगत त्यांच्या आई रुक्मिणी यांना आढळून आला.

 या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक संदिप पालवे, तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिप्परसे, लोहारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक ए. एन. वाठोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेचा तपास करण्यासाठी उस्मानाबाद येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु, आरोपींचा काही सुगावा लागला नाही. 

मृत गोविंद यांच्या आई रूक्मिणी करदोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण हे करीत आहेत.

From around the web