तेरणा भाडेतत्त्वावर देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात याव्यात

तेरणा बचाव संघर्ष समितीची जिल्हा बँकेच्या अध्यक्षाकडे मागणी
 
तेरणा भाडेतत्त्वावर देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात याव्यात

उस्मानाबाद-  तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय व उच्च न्यायालय यांच्याकडे आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तात्काळ सुधारीत प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय व उच्च न्यायालयामध्ये तडजोड करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.४ मार्च २०२१ रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालय सोलापूर येथे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगावार यांच्याशी संपर्क साधून पीएफ संदर्भात बोलणी करण्यासाठी शिष्टमंडळ पाठविले होते. 

या बैठकीत तेरणा  संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या थकीत रकमेबाबत पीएफ कार्यालयाचे आयुक्त पुरुषोत्तम मीना यांनी जिल्ह्यातील शेतकरी व सभासद यांचे हित लक्षात घेऊन येणाऱ्या हंगामात कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने तसेच पीएफ कार्यालयाची बाकी वसूल होण्याच्यादृष्टीने बँकेच्या हमीवर कारखाने भाडेतत्त्वावर दिल्यानंतर येणार्‍या अनामत ठेवीमधून पीएफ कार्यालयाची थकबाकी जमा करून घेण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाच्या परवानगीने सहमतीपत्र देण्याबाबत कळविले होते. 

त्या अनुषंगाने सुधारीत प्रस्ताव कार्यालयाकडे व उच्च न्यायालयाकडे दाखल करणे अपेक्षित होते. परंतु यावर कोणतीही कारवाई केलेली नसल्यामुळे तेरणा भाडेतत्त्वावर देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी तेरणा बचाव संघर्ष समिती शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.

From around the web