धाराशिव आणि तुळजापुरात महिलांसाठी 'बाईपण भारी देवा' मोफत 

 
s

धाराशिव  - केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' सिनेमानं महिलाना अक्षरशः वेड लावलं आहे.   सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून 'बाईपण भारी देवा' सिनेमाने प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. 

या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi),वंदना गुप्ते (vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone),शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुचित्रा बांदेकर (Suchita Bandekar) आणि दीपा परब (Deepa Parab) अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय,उत्कृष्ट कथानक,सुरेल गाणी अन्   दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचं दिसून येत आहे.


लेडीज क्लब धाराशिवच्या वतीने लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या गाजत असलेला केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा मराठी चित्रपट जवाहर टॉकीज, तुळजापूर आणि ताजमहल टॉकीज, धाराशिव येथे महिलांना मोफत दाखवण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लेडीज क्लबच्या वतीने वर्षभर महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असुन महिलांमध्ये सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. अनेक महिलांची इच्छा असून देखील हा चित्रपट पाहण्याची त्यांना संधी मिळत नाही. याच अनुषंगाने खास महिलांसाठी लेडीज क्लबच्या वतीने दि.२९ व ३० जुलै २०२३ रोजी तुळजापूर तालुक्यातील महिलांसाठी जवाहर टॉकीज, तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील महिलांसाठी ताजमहल टॉकीज, धाराशिव येथे दु. १२ ते ०३, ०३ ते ०६ आणि सायंकाळी ०६ ते ०९ असे दोन दिवस तीन शो  मोफत दाखवण्यात येणार आहेत.

तरी तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.  

From around the web