परंड्यात कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

 

परंड्यात कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
उस्मानाबाद - जिल्हयातील परंडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेलय एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावल्याची उस्मानाबाद पोलीस दलातील ही पहिली घटना आहे. परंडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेला एका कर्मचारी गेल्या काही दिवसापासून मेडिकल रजेवर होता. या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 2.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला , हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

परंड्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांना लिव्हरच्या आजाराने ग्रासले होते. त्यामध्ये त्यांची किडनीही व्यवस्थित काम करीत नव्हती. त्यामुळे त्यांना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. सुमारे १० ते १५ दिवस सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना परंडा येथे आणण्यात आले. दरम्यान सोलापूर येथे ॲडमिट असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी तसेच मुलगा सोलापूर येथे जात होते. उपचारानंतर सर्वजण सोलापूरहून परंड्याला आले. मात्र त्यातील पत्नी आणि मुलाला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्या दोघांनी परंडा उपजिल्हा रुग्णालयात जावून स्वॅब दिला. तेव्हा ते दोघेही कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. उपचारानंतर ते दोघेही कोरोनातून मुक्त झाले.

 त्यानंतर पोलिस कर्मचारी आणि त्यांचा दुसरा मुलगा यांचा स्वॅब घेण्यात आला. पुन्हा  दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. त्यातील मुलाची कोरोनातून मुक्तता झाली. मात्र पोलीस कर्मचारी यांना पुढील उपचारासाठी शुक्रवारी (ता. १२ जून) उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नऊ दिवस त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. 


सोमवारी रात्री त्यांना जास्तीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना सोलापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. मात्र मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ताडगाव (ता. कळंब) येथील ते रहिवाशी होते. त्यांनी यापूर्वी ढोकी, कळंब, वाशी आदी ठिकाणी सेवा दिली. पैलवान म्हणूनही त्यांची पोलिस दलामध्ये ओळख होती.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे आतपर्यंत आठ जण मृत्यू पावले असून पोलीस कर्मचाऱ्याचा हा पहिला मृत्यू आहे. जनतेच्या सेवेसाठी, रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढताना , जीव गमवावा लागलेल्या उस्मानाबाद पोलीस दलाच्या या योध्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण -१८४ बरे झालेले रुग्ण १३६ मृत्यू -८ एक्टिव्ह रुग्ण -४०



From around the web