कोरोना : मुरूमजवळील कोथळी गाव सील

 
कोरोना : मुरूमजवळील कोथळी गाव सील


मुरूम - दहा दिवसापूर्वी पुण्यातून कोथळी गावात आलेल्या एकाच २३ वर्षीय तरुणाचा कोरोना रिपोर्ट  पॉझिटिव्ह येताच हे गाव सील करण्यात आले आहे. हा रुग्ण १५ मे रोजी पुणे येथून गावी आला आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण सहा जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.


कोथळी येथील एका २३  वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल शनिवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. शनिवारी रात्रीच या तरुणाच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ यांच्यासह संपर्कातील सहा जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. पुणे येथून हा तरुण ता. १५ मे रोजी कोथळी येथे आला होता. पुण्यामध्ये संपूर्ण कुंटूबासह तो राहत होता.



लॉकडाऊनमुळे काम नसल्याने पुण्यामध्ये राहून तरी काय करायचे, यापेक्षा गावाकडे गेलेले बरे म्हणून या तरुणासह त्याचे कुटुंब गावी आले होते. तब्बल आठ दिवसानंतर ता. २१ मे रोजी या तरुणास ताप आल्याने तो मुरूम (ता. उमरगा) येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. उपचारादरम्यान कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी लातूरला येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

शनिवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मुरुम व परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या रुग्णांच्या संपर्कातील किती जणांना संसर्ग झाला आहे, याची तपासणी आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. काही जणांना मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर येथे तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले आहे.


मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयातून शुक्रवारी (ता. २२) तीन जणांचे स्वॅब घेऊन लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील कोथळी येथील या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर अन्य दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. कोथळीच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच कोथळी गाव प्रशासनाकडून सील करण्यात आले.

या तरुणाचा कुठे- कुठे संपर्क आला आहे, त्याची माहिती घेतली जात आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह गावातील संपर्कातील अन्य नागरिकांचा रात्रीपासूनच शोध सुरु करण्यात येऊन संबंधीत सहा जणांना मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हा तरुण ता. २२ मे पासून ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे यांनी दिली.

रात्री उशीरा ही बातमी कळताच उमरगा येथील उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, सहायक पोलिस निरीक्षक यशवंत बारवकर आदींनी गावाला भेट देऊन चौकशी केली. दरम्यान सरपंच आप्पासाहेब पाटील, उपसरपंच निळकंठ कोट्टरगे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवानंद तुगावे, ग्रामसेवक गोपाळ घंटे, दिनानाथ पोतदार यांनी शनिवारी रात्रीच परिसर बंद ठेवून जनतेला बाहेर पडू नका, असे आवाहन केले. कोथळी गावालगत कर्नाटक राज्याची सीमा असल्याने अगोदरपासूनच तेथे पोलिस बंदोबस्त तैनात आहे. गावातील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

From around the web