देवानंद रोचकरी अद्याप फरारच !

गुन्हा दाखल होवून सात दिवस झाले तरी ठावठिकाणा  लागेना 
 
rochkari
तुळजापूर पोलिसांची संशयास्पद भूमिका 

तुळजापूर  : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी  मातेच्या तुळजापूर  येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद साहेबराव रोचकरी आणि त्यांचा बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह इतर आरोपीं विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद आहे. गुन्हा दाखल होताच देवानंद रोचकरी फरार झाला असून, सात दिवस झाले तरी रोचकरींचा ठावठिकाणा लागत नाही. 

देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्या अटकेसाठी पोलिसांनी दोन पथके नियुक्त केले असून, मोबाईल लोकेशनवरून एकजण औरंगाबाद आणि एक जण कोल्हापुरात असल्याचे समजते. पोलीस रोचकरीना अटक करणार की अटकपूर्व जामिनासाठी सहकार्य करणार ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. 


काय आहे तीर्थकुंड प्रकरण ?

तुळजापूरची तुळजा भवानी हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहे. देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक वर्षातून एकदा का होईना इथे दर्शनासाठी येतोच. या धार्मिक व ऐतिहासिक स्थळामधील प्रत्येक जागा भाविकभक्तांसाठी पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे.

याच तुळजाभवानी माता मंदिर परिसरात एक पुरातन तीर्थकुंड असून, मंकावती तीर्थकुंड या नावाने ते प्रसिद्ध आहे. मात्र, हे तीर्थकुंड वारसाहक्काने आपल्याकडे आले असून हे तीर्थकुंड आपल्या खाजगी मालमत्तेचा भाग असल्याचा दावा करून भाजप नेते देवानंद रोचकरी यांनी हडपले आहे.


 धार्मिक ग्रंथात आणि पुराणात उल्लेख असलेले हे तीर्थकुंड खासगी कसे काय होऊ शकते, असा भाविकांचा सवाल आहे. तुळजाभवानी मंदिरासमोरील परिसरात तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराचे हे मंकावती कुंड आहे. या कुंडाची महती स्कंद पुराणात आहे. तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणातही या कुंडाचा उल्लेख सापडतो. या कुंडावर पूर्वी भाविक स्नानासाठी जात. परंतु नंतरच्या काळात हे कुंड खासगी असल्याचा दावा भाजप नेते देवानंद रोचकरी यांनी केला आहे. त्यामुळे तेथे कोणी स्नानासाठी जात नाही. त्या परिसरात रोचकरी यांनी खासगी बांधकामही केलंय.

याबाबत स्थानिक व भाविकांनी आवाज उठविल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून, हे कुंड हडपणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. 

रोचकरी यांच्यावर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468, 469, 471 आणि 34 सह गुन्हा नोंद असून तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करीत आहेत. तिर्थकुंड हडप प्रकरणात रोचकरी बंधूची प्रथम खबरमध्ये नावे असून त्यांना या प्रकरणात कोण कोण मदत केली ? या कटात तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयासह नगर परिषद व इतर कार्यालयातील कोणते घोटाळेबाज अधिकारी अडकले आहेत? हे पोलीस तपासात समोर येणार असून राज्यभर गाजलेल्या या प्रकरणाचा तपास करणे व मूळ आरोपीसह कटात सहभागी अधिकारी यांना शोधणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.
 

From around the web