वादग्रस्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची अखेर उचलबांगडी
Mar 15, 2020, 21:01 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर उस्मानाबादचे वादग्रस्त आणि भ्रष्ट जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची अखेर रायगडला उचलबांगडी करण्यात आली आहे. बळीराजा चेतना अभियानमध्ये पुस्तकांचा जो घोटाळा झाला, त्यात सानप यांचा मुख्य हात होता, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास पाठीशी घातले होते.
गेल्या तीन वर्षांपासून उस्मानाबादला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सानप कार्यरत होते,दोन वर्षापूर्वी एका सहकारी महिला कर्मचाऱ्यास त्रास दिल्यामुळे सदर महिलेने काही पत्रकारांच्या व्हाट्स अँपवर आत्महत्या करणार असल्याचे मेसेज पाठवले होते, त्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्याने आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर एका म्युझिक कंपनीच्या फायदासाठी तुळजाभवानी मंदिराची विना परवाना ड्रोन कॅमराने शूटिंग केली म्हणून त्यांच्यावर तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. तसेच बळीराजा चेतना अभियानमध्ये जो पुस्तक घोटाळा झाला होता, त्यात सानप यांचा हात असल्याचे पुरावे समोर आले आहे.
मागील सरकारमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सानप यांना पाठीशी घातले होते. परवा बळीराजा चेतना अभियान मधील पुस्तक घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी सानप यांचा भांडाफोड उस्मानाबाद लाइव्हने पुन्हा एकदा केला होता. तसेच याच अभियानाचे दोन भाग दूरदर्शन वृत्तवाहिनीवर दाखवण्याचे जवळपास सात लाख रुपये बिल नगरच्या एका मीडिया कंपनीकडून घेऊन सानप यांनी मोठा घोटाळा केल्याचे बिंग उस्मानाबाद लाइव्हने फोडले होते. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेण्यात आली आणि सानप यांची रायगड म्हणजे अलिबागला बदली करण्यात आली आहे. सानप यांच्या मागील सर्व प्रकरणाची नव्याने चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.विशेष म्हणजे राज्यात फक्त माहिती अधिकारी सानप यांच्याच बदलीची ऑर्डर निघाली आहे.