शेलगावच्या सुभाष तवले खून प्रकरणी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

धाराशिव - कळंब तालुक्यातील शेलगाव येथील सुभाष भुजंग तवले यांचा दि.१९-२० जुलैच्या दरम्यान धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास करण्यात येरमाळा पोलीस निष्क्रीय ठरले आहेत. त्यामुळे या खुनाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मूक मोर्चा काढला होता.
कळंब तालुक्यातील शेलगाव येथील सुभाष भुजंग तवले (वय- ४० वर्षे) या तरुणाचा दि. १९-२० जुलै २०२३ च्या पहाटे ६.४५ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने गळा चिरून खून कऱण्यात आला होता. त्यानंतर मयत सुभाषचे वडील भुजंग यांनी प्रत्यक्ष पाहणी करून येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून शेलगाव येथील रविंद्र लिंबराज तवले (वय- ३६ वर्षे) याच्या विरुद्ध गुरनं २२७/२०२३ कलम ३२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीच्या ताब्यातून कुऱ्हाड जप्त कऱण्यात आली आहे. पण या आरोपीला निर्दोष मुक्तता व्हावी व तपासा दरम्यान काहीतरी जप्त केलेले शस्त्र असावे म्हणून नाममात्र शस्त्र जप्त केल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. कारण त्या कुऱ्हाडीचा व या खुनाचा कसलाही संबंध नाही व या घटनेचा आरोपीला फायदा मिळणार आहे.
गुन्हा घडवून एक महिन्याचा कालावधी लोटला असताना आरोपी रविंद्र तवले याच्यासोबत असलेले इतर साथीदारांचा अद्यापपर्यंत तपास केलेला नाही. त्यामुळे त्या आरोपीचा शोध घेण्याबरोबरच गळा चिरण्यासाठी वापरलेले धारदार शस्त्र कोयता, तलवार किंवा इतर शस्त्र ज्याच्या मदतीने हा गळा चिरणे शक्य आहे ते जप्त करणे आवश्यक आहे. हा गुन्हा किती आरोपींनी केला आहे ? त्या सर्व आरोपींना अटक करून त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. तसेच अशा क्रूर कृत्य करणाऱ्या सर्व आरोपींना कायद्याप्रमाणे शिक्षा होणे शक्य होईल. याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांच्याकडून हा तपास काढून सीआयडीकडे देण्यात यावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी हा मोर्चा काढला.
यावेळी मयत संतोष तवले यांचे वडील, भाऊ व गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मूक मोर्चामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कुटुंबियांनी आम्ही दहशतीखाली वावरत असून आरोपींपासून आम्हाला धोका असल्यामुळे त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रसार माध्यमांसमोर केली.