माणसांना प्रकाशमान करणारा महासुर्य : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 
माणसांना प्रकाशमान करणारा महासुर्य : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म हिंदू धर्मातील महार जातीत झाला. ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र ही वर्णव्यवस्था भारतात अस्तित्वात होती. शूद्र या घटकात महार, मांग, चांभार आणि ढोर या जातींचा समावेश होता. खालच्या दर्जाची कामे या जातीतील लोकांनी करायची असा नियमच ठरवून दिलेला . त्यावेळी जातीयतेचे स्तोम प्रचंड प्रमाणात माजलेले होते .माणसंच माणसांचा तिरस्कार करत होती . अस्पृशांना कोणी बहिष्कृत, अस्पृश्य, परिया किंवा अतिशूद्र म्हणत तर कोणी अंत्यज ,अवर्ण व मानशूद्र म्हणून संबोधित. अस्पृश्य समाजाच्या वाट्याला लाजिरवाणे, वेदनादायी जीवन आले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जातीयव्यवस्थेने हिरावून घेतलेला होता . जनावरांना स्पर्श करणे चालत असे, परंतु माणसांना स्पर्श म्हणजे विटाळ अशी भयावह परिस्थिती अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली .सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यासाठी बंदी .शाळेत प्रवेश नाही.  अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानण्यात येत असे. मंदिरामध्ये प्रवेश नाही.इतके कलंकित जीवन जगावे लागे. रस्ते साफ करणे .घाण काढणे .मृत जनावरे ओढून टाकणे ,त्याची कातडी सोलणे ,अशी कामे त्यांच्या वाट्याला आलेली . रस्त्यावर थुंकण्याचा अधिकार नाही ,रस्त्यावर चालण्याचा अधिकार नाही. गळ्यात मडकं बांधून रस्त्यावर चालावे लागे .जमिनीवरील पायाची ठसे बुजविण्यासाठी कमरेला बोराटीची फांदी बांधलेली असायची, अशी पशुतुल्य वागणूक अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली. अन्याय,अत्याचार सहन करत जीवन जगायचं . स्वतःचं अस्तित्व काहीच नाही . गावाच्या बाहेर  अस्पृश्यांची वस्ती उभारलेली असे. दारिद्र्यात जीवन जगणारा हा समाज .अंगावर अंगभर वस्त्र नाही.पोटाला पोटभर भाकर नाही. निवाऱ्यासाठी जागा नाही. दारिद्र्यातच जन्माला यायचं अन दारिद्र्यातच जीवन जगायचं अन दारिद्र्यातच मरायचं असा हा उपेक्षित  घटक. 

            धार्मिक,सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक, सांस्कृतिक  बंधने कडक होती. त्यामुळे हा समाज माणुसकीला पारखा झाला होता . विकासापासून कोसो दूर असणाऱ्या ,जातीयतेचे चटके सहन करणाऱ्या, हिंदू धर्मातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीमध्ये 14 एप्रिल 1891रोजी भीमरावांचा जन्म रामजी मालोजी सपकाळ(आंबवडेकर)व भीमाबाई यांच्या पोटी महू येथे झाला .रामजींच्या पोटी  14 वे रत्न जन्माला आले , त्यांचे नाव भीम असे ठेवण्यात आले .भीमाला घरी भीवा या नावाने संबोधित .रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडपासून पाच मैलावर आंबवडे नावाचे एक खेडे , घराण्याचे कुलनाव सकपाळ होते . हेच त्यांचे मुळ गाव .भीम लहानपणापासूनच अभ्यासात हुशार .भीम अडीच तीन वर्षाचे असताना वडील नोकरीतून सेवानिवृत्त झाले .पुन्हा ते  परीवार घेऊन काप दापोलीस आले . तेथील मराठी शाळेत भीमाचा थोरला भाऊ आनंदराव याचे शिक्षण चालू झाले .त्याच शाळेत भीमाने शिक्षणाचा आरंभ केला .परंतु ते जास्त काळ काप दापोलीस राहू शकले नाहीत. ते कुटुंब मुंबईस रवाना झाले .तेथील नातेवाईकांच्या ओळखीमुळे रामजींची सातारा येथे सरकारी कार्यालयात नेमणूक झाली . साताऱ्यातील लष्करी शाळेत भीमाचे नाव घातले गेले . सातारला बिऱ्हाड गेल्यानंतर थोडया दिवसांनी भीमाबाईचे देहावसान झाले .त्यावेळी भीमराव सहा वर्षाचे होते .मातेच्या निधनानंतर भीमराव यांचा सांभाळ आत्या मीराबाई हिने केला. 


      अस्पृश्यांच्या दंशाची जाणीव भीमाला लहानपणापासूनच होत होती .आपणाला शाळेत वेगळे का बसविण्यात येते?घरातून शाळेत बसण्यासाठी गोणपाट का न्यावी लागतात ? काही शिक्षक आपल्या वह्या पुस्तकांना हात का लावत नाहीत?विटाळाच्या भीतीने प्रश्न विचारायचे का टाळतात? या गोष्टी भीमाला कळू लागल्या होत्या .या गोष्टीची चीड भीमाच्या मनात निर्माण झाली होती .आई बाजारात गेल्यानंतर लांबूनच कपडे का निवडते?पाणी पिताना ओंजळीने प्यावे का लागते ? असे एक ना अनेक प्रश्न भीमाच्या बाल मनाला पडत असत . डोईचे केस न्हावी कापीत नसे.त्यावेळी त्याची बहीण ओट्यावर बसून त्याचे केस कापी त्यावेळी भीमाला वाईट वाटे . अस्पृश्यता हा मानवी जीवनाला कलंक आहे,याची त्याला जाणीव होऊ लागली .

         भीम माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होता .त्या शाळेत आंबेडकर नावाचे गुरुजी होते.भीमाचे आडनाव अंबावडेकर हे ठिक वाटत नाही , म्हणून त्यांनी आपलं आंबेडकर हे सुटसुटीत नाव लावावे असे आंबेडकर गुरुजींनी भीमाला सांगितले . तशी शाळेच्या दप्तरामध्ये त्यांनी नोंदही करून टाकली.
 बाबासाहेबांना लहानपणापासून वाचनाची आवड होती .एखादे पुस्तक पाहिले की ते वडिलांना हट्ट करत.कधी - कधी पैशाची अडचण भासे.परंतु रामजींनी भीमाला पुस्तके कमी पडू दिली नाहीत .तेंव्हा रामजी कांतेकरांकडे दिलेल्या मुलीकडे जात. तिच्याकडून पैसे उसने घेत असत .पैसे नसतील तर एक दागिना उसना घेत व तो मारवाड्याकडे गहाण ठेवत .पैसे मिळताच मुलास पुस्तक विकत घेऊन घरी येत असत.मासिक सेवानिवृती पगार हाती येताच तो दागिना सोडवून परत मुलीला देत .

      पुढील शिक्षणासाठी भीम एल्फिन्स्टन शाळेत जाऊ लागला. या शाळेतही भीमाला ,जातीयतेचे , अपमानाचे चटके सहन करावे लागले . बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत असत .एकदा शिक्षकाच्या सांगण्यावरून भीम गणिताचे उदाहरण सोडवण्यासाठी फळ्याकडे जात असताना वर्गातील सर्व मुले आपले डबे घेण्यासाठी धावली .शिक्षकही दूर उभे राहत असत .अशा परिस्थितीत चटके खात भीम 1907 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले .महार मुलाने मॅट्रिकच्या परीक्षेत यश मिळवायचे म्हणजे त्याकाळी ती अघटित घटनाच .मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर थोड्या दिवसात त्यांच्या विवाहाचा बेत ठरला .त्यावेळी लहान वयातच विवाह होत असत .विवाहसमयी भीमरावांचे वय सतरा वर्षाचे होते .मुलीचे वय नऊ वर्षाचे होते .मुलीचे सासरचे नाव रमाबाई ठेवण्यात आले .रमाईचे वडील भिकू धुत्रे  हे दाभोळ जवळील वणंदगावचे .ते दाभोळ बंदरावर हमाली करत .रमाईच्या लहानपणीच आईबाप निर्वतले होते .त्यांचा सांभाळ चुलत्याने नि मामाने केला . रमाईसोबत बाबासाहेबांचा विवाह झाला .

             बाबासाहेब सांगतात, " शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा." त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सोडले नाही.परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी घरची परिस्थिती नव्हती, बडोदा सरकारच्या शिष्यवृत्तीच्या बळावर उच्च शिक्षणासाठी भीमराव 1913 मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्कला गेले .तेथे गेल्यानंतर सुखविलासी जीवन जगले नाहीत .जवळ पैसे नाहीत, याची त्यांना जाणीव होती.चित्रपट पहायला जाणे,सौंदर्यस्थळे पाहणे,सहलीला जाणे,यासारखे विचार त्यांच्या मनाला स्पर्शले नाहीत.परदेशात शिक्षणासाठी गेल्यावरही त्यांची उपासमार झाली . आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या . त्यांना सपाटून भूक लागे .एक कप कॉफी,दोन केक,एक बशी सागुती किंवा मासे यावरच भूक शमवावी लागे. त्यातून काही पैसे पत्नीला घरखर्चासाठी पाठवावे लागत . असे हलाखीचे जीवन परदेशात शिक्षण घेत असताना बाबासाहेबांच्या वाट्याला आले. 

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिमानाने सांगतात, " आयुष्यात मिळालेल्या संधीचा भरपुर लाभ घेण्यासाठी प्रत्येक क्षण सोन्याचा कण मानून अभ्यासासाठी व्यतीत केला .धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला ." बाबासाहेब अमेरिकेत रोज अठरा अठरा तास अभ्यास करत असत .दोन वर्षाच्या अखंड तपश्चर्येनंतर  '  प्राचीन भारतातील व्यापार  ' या विषयावर त्यांनी 1915 साली प्रबंध लिहून एम.ए. ही पदवी संपादन केली . पुढे 'भारतीय राष्ट्रीय नफ्याचा वाटा:एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन' हा प्रबंध 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयाने स्वीकारला .पुढे आठ वर्षांनी लंडनमधील पी.एस.किंग.अँड सन्स ह्या प्रकाशन संस्थेने हा प्रबंध विस्तृत स्वरूपात '  ब्रिटीश भारतातील प्रांतिक उत्क्रांती ' या नावाने प्रसिद्ध केला .या ग्रंथाच्या छापील प्रती बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विश्वविद्यालयाला सादर करताच '  डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ' ही अत्युच्च पदवी बहाल केली . बाबासाहेब काही काळ मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक झाले . ते नामांकित वकिल होते. पुढे ते लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले . 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स' ह्या संस्थेत आंबेडकरांनी अभ्यास सुरू केला .त्यांनी बॅरिस्टरीचा अभ्यासही ग्रेज इनमध्ये सुरू केला.

           बाबासाहेब पोटास चिमटा काढून जेवढे ग्रंथ विकत घेणे शक्य होत तेवढे घेत .ते अपुरे अन्न खाऊन सकाळी म्युझियममध्ये वाचायला जात .पोटाची भूक मारून अभ्यास करत .टिपण वह्यानी खिसे फुगलेले,चेहरा घामाने डबडबलेला ,शरीर शिणलेले पण डोळे टवटवीत असे बाबासाहेब वाचनालयातून शेवटी बाहेर पडत . एवढी अभ्यासावर प्रचंड निष्ठा  होती . रात्रंदिवस अभ्यासात मग्न असायचे. अस्नोडकर नावाचे एक गृहस्थ बाबासाहेबांसोबत खोलीत राहत असत. ते बाबासाहेब आंबेडकरांना कळकळीने म्हणत,अहो आंबेडकर ,रात्र  फार झाली किती जागता दररोज आता विश्रांती घ्या. झोपा . 'तेंव्हा बाबासाहेब शांतपणे म्हणत, ' अहो, अन्नाला पैसा व झोपायला वेळ मजपाशी नाही '

            अमेरिकेचे अध्यक्ष बेंजामिन फ्रँकलिन म्हणत की, यश दोन गोष्टीवर अवलंबून असते .अखंड उद्योग आणि काटकसरीची राहणी .'बाबासाहेब आंबेडकर इतक्या काटकसरीने लंडनला राहत होते की त्यांचा मासिक व्यय आठ पौंडाच्या पुढे जात नसे .तरी प्रकृती नि मन उल्हासित .लंडन विद्यापीठातून  'प्रॉव्हिन्शल डिसेंट्रलाईझेशन ऑफ इंपिरियल फायनॅन्स  इन ब्रिटिश इंडिया' हा विषय घेऊन 1921च्या जूनमध्ये ते एम.एस्सी. झाले .बाबासाहेब आंबेडकरांनी 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी' हा प्रबंध लंडन विद्यापीठाला 1922 मध्ये सादर केला .पुढे 1922 ला ते बॉन विद्यापीठात शिक्षणासाठी गेले . ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले .त्यांना लंडन विद्यापीठाने  ' डॉक्टर ऑफ सायन्स ' ही पदवी 1923 च्या शेवटी बहाल केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक हाल अपेष्टा सहन करत उच्च शिक्षण घेतले .त्यांनी तीन विश्वविद्यालयात ज्ञानसंपादनासाठी तपश्चर्या केली. उच्च शिक्षणाचा उपयोग अखंड समाजसेवेसाठी केला. दलितांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली .समाज प्रवाहापासून दूर असलेल्या उपेक्षित समाजाला न्याय मिळवून दिला.

          महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह,काळाराम मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला .आम्ही ही माणसं आहोत ,माणसाचं श्रेष्ठत्व जातीवरून न ठरवता कर्तत्वावरून ठरतं, हा  मानवतावादी विचार समाजात पेरला. 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात भारतीय संविधाची निर्मिती केली .या महामानवाने आपले अखंड आयुष्य समाजसेवेसाठी वेचले . 1990 मध्ये भारत सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न'  या पुरस्काराने सन्मानित केले .अर्थशास्त्र , धर्मशास्त्र ,राज्यशास्त्र ,समाजशास्त्र ,मानववंशशास्त्र,इतिहासकार,तत्वज्ञानी,संशोधक ,पत्रकार ,संविधानाचे जनक ,लेखक, दलित आणि महिला अधिकारांचे उद्धारक ,पाली, बौद्ध साहित्याचे अभ्यासक,संस्कृत, हिंदी साहित्याचे अभ्यासक ,राजनीती तज्ञ ,विज्ञानवादी, जलतज्ञ ,समता ,स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते ,शेतकरी,कामगार,गोरगरीबांचे कैवारी  महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. माणसांना प्रकाशमान करणाऱ्या या तळपणार्या महा सूर्यास जयंतीनिमित्त विनम्र  अभिवादन ..!


 - प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे
 सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, तेरणा महाविद्यालय,  उस्मानाबाद.
  मो. 9881103941
 

From around the web