लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

उस्मानाबाद : अपघाताचा पंचनामा देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या बेंबळी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली. योगेश गोविंद पवार असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

योगेश पवार हे उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ३ मार्च रोजी बेंबळी ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती. या अपघाताच्या पंचनाम्याची प्रत तक्रारदाराने योगेश पवार यांच्याकडे मागितली होती. या कामासाठी पवार यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये मागितले.

याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने आज पंचासमक्ष पडताळणी केली. यामध्ये योगेश पवार याने तक्रारदाराकडून लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने पोलीस ठाण्यात सापळा रचला. पवार याला पोलीस ठाण्यातच लाच स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने योगेश पवार यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी बेंबळी ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

admin

Read Previous

चार गावाच्या कामाची चौकशी होणार

Read Next

रवी सरांना इरोध !