दावणीला चारा मिळेना ! शेतकरी हताश !!

उस्मानाबाद – जिल्ह्यात चारा छावण्या सुरू होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. जनावरांच्या दावणीला चारा मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. तालुका स्तरावर छावणीच्या प्रस्तावांचा ढिगारा साचला असला तरी जिल्हास्तरावर मात्र मोजकेच प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे चारा छावणी सुरू करण्याबाबत उदासीनता का? असा प्रश्‍न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

जिल्ह्यात सुमारे सात लाखांपेक्षा जास्त पशुधन आहे. डिसेंबर २०१८ मध्ये शासनाने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करूनही अद्याप जिल्ह्यात चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. चारा छावणी सुरू करण्याचे प्रस्ताव जानेवारी महिन्यातच मागविले होते. तालुका स्तरावर अशा प्रस्तावांचा ढिगारा साचला आहे. मात्र, त्रुटीमध्ये अडकल्याचे कारण पुढे करीत जिल्हास्तरावर सध्या १० ते १५ प्रस्ताव पोचले आहेत. त्यातच पालकमंत्र्याच्या सहीने असे प्रस्ताव मंजूर होतात. त्यामुळे त्याला विलंब लागत असल्याचे बोलले जातेय. सध्या ग्रामीण भागात पाण्याची तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांना ओला चारा तर सोडाच पण, कोरडा चारा मिळणेही कठीण आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या चारा टंचाईने त्रस्त झाले आहेत.

जित्राब कशी जगवावीत, अशा विवंचनेत शेतकरी अडकले आहेत. दावणीला चारा देण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र, दावणीला तर सोडाच, पण चारा छावणीही सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना जित्राब सांभाळणे कठीण होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

प्रस्ताव जिल्हास्तरावर येईनात
संस्थांकडून परिपूर्ण प्रस्ताव दाखल होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे; तर दुसरीकडे प्रस्ताव दाखल करून महिना झाला तरीही तालुका स्तरावरून याचा विचार होत नसल्याचे संस्थाचालक सांगत आहेत. शेतकरी चारा छावण्यांसाठी उत्सुक नाहीत, तर त्यांना जनावरांना जगविण्याची कसरत करावी लागत आहे. चारा छावण्यात आर्थिक गैरव्यवहार होतो, या भीतीने छावण्या सुरू करण्यास प्रशासन धजावत नसल्याची कुजबूज सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

admin

Read Previous

सासरच्या त्रासास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Read Next

उमरगा – हाणामारी प्रकरणी चार पोलीस निलंबित