हॅलो सर !

बबल्या – अरं ये पक्या,लेका हाईस तर कुठं ? अन् उमरग्यात  कसं काय येणं केलं म्हणायचं?
पक्या – म्या व्हय, गेलो व्हतो पोटापाण्यासाठी मंबईला… आता आलो परत गावाकडं  …
बबल्या –  असं व्हयं ..मला वाटलं आता इलेक्शन जवळ आलंय…तवा आलास की काय मोर्चेबांधणी करायला …
पक्या – इलेक्शन,बिलक्शन काय नाय… म्या सरांना भेटायला आलो व्हतो …भेटतील नव्हं…
बबल्या – भेटतील की….न भेटायला काय झालं ?
पक्या – लेका त्यांचा मोबाईल पण स्वीच ऑफ लागतोय…तवा म्हटलं प्रत्यक्षच जावून भेटायचं…
बबल्या – अरं ते बिझी असतात,त्यामुळे मोबाईल कवा बवा स्वीच ऑफ ठेवत्यात…
पक्या – नेेहमीच कसं काय बिझी असतात रं ? कवा बी फोन करा…मोबाईल स्वीच ऑफच लागतो…
बबल्या – अरं ते लोकसभेत असतात,तवा मोबाईल बंद ठेवत्यात…
पक्या – जवा नसत्यात तवा बंद का असतो मग?
बबल्या – तवा ना, कधी प्रवासात असतात,कधी दौर्‍यात असतात त्यामुळे  नसते कधी कधी रेंज …
पक्या – इलेक्शनच्या आधी तर मोबाईल 24 तास चालू ठेवण्याचं आश्‍वासन दिलं व्हतं की…
बबल्या – अरं काय ते मोबाईलचं लावून बसलास,दुुसरं काय तर बोल…
पक्या – बरं ते कसगी गाव दत्तक घेतलं व्हतं …झालं का त्या गावाचा इकास ?
बबल्या – बराच झाला की,अन् राहिलेला व्हईल की….
पक्या – परवा एक कसगीवाला भेटला व्हता,म्हणाला कसला ढेकळाचा इकास …
बबल्या – अरं त्यो बसवराजचा कार्यकर्ता असेल…असंच बोंबलणार की…
पक्या –च्या मारी, सरांनी कसली कामं केली न्हायती म्हणून उस्मानाबादमंधी लई बोंंबाबोंब सुरू हाय…
बबल्या – ती डाक्टरची माणसं असतील…डाक्टर पडल्यापासून अशीच बोंबल्यात…
पक्या – आता डाक्टर साहेब तरी नाय उभारणार,मग कोण असेल रं राष्ट्रवादीचा उमेदवार..
बबल्या – कोण का उभा राहिना….आमचं सरच पुन्हा सर करणार…
पक्या – असं व्हय..बघूच की…येतो मी सरांना भेटून…
    ( तेवढयात तुक्याचे आगमन )
तुुक्या – अरं ये पक्या,इकडं कसं काय ?
पक्या – अरं सरांना भेटायला आलो व्हतो….
तुक्या – अरं ते आताच हैद्रबादला गेलेत,तेथून इमानानं दिल्लीला जाणार हायती…
पक्या – बोंबला आता, मला वाटतं हे सर आता इलेक्शनमंधीच भेटणार…
तुक्या – थांब,म्या सरांना फोन करतो…
( फोनमधून आवाज – ज्या नंबरवर आपण फोन केला आहात,तो आता बंद आहे )

पक्या,तुक्या डोक्याला हात लावून बसतात…

admin

Read Previous

कन्यादान !

Read Next

जवान बालाजी गुरव हल्ला प्रकरणी गुरव समाज आक्रमक