वृद्ध आई – वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या निर्देयी मुलाविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद – वृद्ध  आई – वडिलांचा  सांभाळ न करणाऱ्या निर्देयी मुलाविरुध्द उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या आदेशावरून  आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चरितार्थ व निर्वाह खर्चासाठी दरमहा 10 हजार रुपये देण्याचा आदेश न  पाळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उस्मानाबाद तालूक्यातील दारफळ येथील रहिवाशी लक्ष्मण जनार्दन देशपांडे ( वय ८० ) व त्यांची प्रभावती यांचा एकुलता एक मुलगा श्यामसुंदर लक्ष्मण देशपांडे (पाटील) जो व्यवसायाने टाईपरायटींग इन्सीट्युट व शेतकरी आहे. त्याने आपल्या आईच्या नावावरील मौजे मेडसिंगा येथील जमिनीमध्ये लाईट कनेक्शन घ्यावयाचे आहे असे कारण दाखवत शंभर रुपयाचा स्टॅम्प आईच्या नावे खरेदी करुन त्यावरती आईची सही घेवून त्यावरती जमिनीचे वाटणीपत्र लिहून घेतले.  या वाटाणी पत्राआधारे स्वतःचे नाव लावून घेवून त्यातून आईला बेदखल केले. त्याचप्रमाणे वडीलाच्या नावे सांजा रोड भागातील फ्लॉट व मौजे दारफळ येथील राहते घर स्वतःच्या नावे करुन घेवून आई वडिलांना वार्‍यावर सोडून दिले.

त्यामुळे वृध्द मातापित्यांनी मुलाविरुध्द उस्मानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे मातापिता संगोपन कायद्यातंर्गत दाद मागितली. यावर उपविभागीय दंडाधिकारी यांनी दोन्ही बाजू म्हणणे ऐकूण घेवून यामध्ये मुलाने मातापित्यास फसवणूक व संगोपन करत नसल्याचे सिध्द झाले. त्यामुळे उपविभागीय अधिाकरी यांनी मुलाने मातापित्यास त्यांच्या चरितार्थ व निर्वाह खर्चासाठी दरमहा 10 हजार रुपये देण्याचा आदेश 10 जुलै 2017 रोजी दिला. परंतू त्या आदेशविरुध्द श्यामसुंदर यांने जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. या अपीलावर जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेवून उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेला आदेश कायम ठेवला. यामध्ये दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कायम ठेवला. परंतू आदेश देवूनही श्यामसुंदर यांने त्या आदेशानंतरही एक रुपयाही मातापित्यास दिला नसल्याने वृध्द मातापित्यावर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे मातापित्यास उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पोटगी मिळावी यासाठी मागणी अर्ज केली. यावरुन श्यामसुंदर यांने एसडीओ व जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याचे निर्देशनास आले. त्यावरुन भादंविचे कलम 188 व जेष्ठ नागरिकांचे चरितार्थ व लोककल्याणासाठीचे अधिनियम 2007 मधील कलम 24 व 25 नुसार गु.र.नं 11/18 आनंदनगर पोलिस ठाण्यात श्यामसुंदर देशपांडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोनि मुरळीकर हे करत आहेत.

admin

Read Previous

उलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड

Read Next

मौजे गोविंदपुर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग