लोकसभा निवडणूक : संभाव्य उमेदवार कोण राहणार ?

उस्मानाबाद – लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे सर्वच पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. कोणत्या पक्षाचे कोणते संभाव्य उमेदवार राहतील, याबाबत सध्या मतदार संघात चर्चा रंगली आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदार  संघात शिवसेनेने अनेकवेळा बाजी मारली आहे. आता हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यास भाजपला अधिक जोर लावावा लागणार आहे.

शिवसेनेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना पुन्हा मिळण्याची शक्यता असली तरी, संपर्क नेते आमदार तानाजी सावंत यांचा त्यांना प्रखर विरोध आहे. त्यांनी माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची शिफारस केली आहे.  उमेदवारीवरून शिवसेनेत दोन गट पडले असून, सेनेतील गटबाजी ऐन निवडणुकीत डोके वर काढण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून नितीन काळे, सुधीर पाटील, काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले प्रताप पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादीची उमेदवारी जिल्हा परिषद उपाध्यक्षा आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांना मिळण्याची दाट शक्यता मतदार संघात वर्तवली जात असली तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सौ. अर्चना पाटील यांना ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. ते  आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना स्वतः निवडणूक लढण्याचा आग्रह करीत असल्याचे समजते. एक तर स्वतः लढा नाही तर पक्षाने दिलेला उमेदवार मान्य करा, अशी तंबी दिल्याचे समजते.  आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढण्यास नकार दिल्यास बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

admin

Read Previous

Help reader survey make mfs better with our reader

Read Next

शेतमजुराचा मुलगा झाला सी.ए. !