पोलीस स्टेशन चकाचक… कारभार मात्र भंगार !

उस्मानाबाद जिल्ह्यात अठरा पोलीस स्टेशन आहेत, हे सर्व पोलीस स्टेशन आयएसओ नामांकन प्राप्त झाली आहेत, असा डांगोरा पिटण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हे पोलीस स्टेशन दिसायला चकाचक असली तरी कारभार मात्र भंगारछापच आहे, हे पुन्हा एकदा समोर आलंय.

एप्रिल महिन्यातील तीन घटना …
1.मुंबईत पत्रकारिता करणारे विकास पांढरे इटकळ गावात जत्रेसाठी आल्यानंतर त्यांना पोलिसांनी मारहाण केली…
2. मुरूम पोलिसांनी एका तरुणास दारू विक्रीच्या संशयावरून चप्पल तुटेपर्यंत मारहाण केली…
3. आनंदनगर पोलिसांनी विनयभंगाची तक्रार घेवून आलेल्या महिलेस तब्बल 18 तास ताटकळत ठेवत आरोपीप्रमाणे वागवून दिली…

पहिल्या प्रकरणात सपोनिची उस्मानाबादला तात्काळ बदली करण्यात आली आहे,
दुसऱ्या प्रकरणात सपोनिस पाठीशी घालण्यात आले आहे तर तिसऱ्या प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे.

उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशन तर नेहमीच वादग्रस्त ठरले आहे, यापूर्वीच्या साहेबांनी खोट्याचे खरे आणि खऱ्याचे खोटे करण्याचा पायंडा पाडला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जिल्हा माहिती कार्यालयातील आशा बंडगर या महिला कर्मचाऱ्याने जिल्हा माहिती अधिकारी रात्री बेरात्री बोलावतात, तसेच त्यांच्या वागणुकीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिलेला आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. या साहेबांनी एका पाईपचोरी प्रकरणात लाखोंची माया जमवली, अनेक प्रकरणात तडजोडी केल्या मात्र मोठ्या साहेबांचा तो ‘लाडका’ असल्याने कारवाई झाली नाही. बीडीडीएसमध्ये असताना एका महिला पोलिसांने गंभीर तक्रार केली असताना त्या महिला पोलिसांस खोटे ठरवण्यात आले आणि उलट तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
सन 2016 मध्ये सध्या ढोकीत असलेल्या महिला पोलीस दळवी यांनी याच सपोविरुद्ध अनेक तक्रारी करूनही त्यास पाठीशी घालण्यात आले.

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि संभाजी पवार विरुध्द एका महिला पोलिसाने कसा मानसिक त्रास होतो याचा पाढा वाचला पण पवारलाही पाठीशी घालण्यात आले.

जिथे पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलिसांना तसेच शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांना न्याय भेटत नाही, तिथे सर्वसामान्य आणि गोरगरीब महिला आणि मुलींनी तक्रार केल्यानंतर कसा आणि काय न्याय भेटणार आहे ? असाच प्रश्न निर्माण झालाय.

एक शासकीय महिला कर्मचारी विनयभंगाची तक्रार नोंदवण्यास स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाते तेव्हा फार फार तर अर्ध्या तासात तिची तक्रार नोंदवून घेणे बंधनकारक आहे, मात्र तब्बल 18 तास तिला पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत बसवण्यात आले इतकेच काय तर तिला आरोपीप्रमाणे वागणूक देण्यात आली,शेवटी तिने हेल्पलाईनला तक्रार केली तर सपोनि गात यांनी सर्वांसमोर अपमान केला तर दुसरीकडे आरोपी असलेल्या शिक्षणाधिकारी सचिन जगतापला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून मानपान देण्यात आला, चहापाणी करण्यात आले आणि आर्थिक तडजोड करून सन्मानाने घरी पाठवण्यात आले, सपोनि ‘गात’ यांचा कारभार कसा ‘घात’ आहे हेच यातून दिसून आले.

मात्र उस्मानाबाद लाइव्हने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला, प्रकरण लावून धरले, पाठपुरावा केला म्हणून मुंबईच्या गृहविभागाकडून सूत्रे हलली, नाईलाजाने का होईना शिक्षण खात्याला कलंक असलेल्या जगतापविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला, मात्र यामुळे पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे पुन्हा एकदा निघाले. उस्मानाबादच्या पोलिसांचा कारभार पारदर्शक नसून कसा काळाकुट्ट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

केवळ पोलीस स्टेशन चकचकीत करण्याऐवजी कारभार पारदर्शक करा, तरच जनतेचा आयएसओ मिळेल ! पैसे देवून तर कोणीही आयएसओ प्रमाणपत्र आणतो !

– सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
www.osmanabadlive.in
9420477111

admin

Read Previous

एस.पी.साहेब…

Read Next

सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वे मार्ग मार्गी लागेल ?