पत्नी पळून गेल्याने दोन मुलांसह पतीची आत्महत्या

किनवट : पत्नी पळून गेल्याचा वियोग सहन न झाल्यामुळे पतीने आपल्या एका मुलीला व मुलाला विषारी औषध पाजून व स्वतःही विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटना किनवट पोलिस ठाण्यांतर्गत वडोली जंगलात घडली.

माहूर तालुक्यातील रामू नाईक तांडा येथील संतोष चव्हाण (वय 35 वर्षे) याची पत्नी काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीसोबत पळून गेली. पत्नी पळून गेल्याच्या मानसिक धक्क्याने त्याने आपली मुलगी वेदिका (वय 12 वर्षे) आणि मुलगा रुपेश (वय 10 वर्षे) दोघांना विषारी औषध पाजून आणि स्वतःही पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. मागील आठ दिवसांपासून त्याने मुलांना घेऊन गाव सोडले होते. त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध ही केली होती. अशातच शनिवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजता किनवट पोलिस ठाण्याला माहिती मिळाली.

या माहितीवरून पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी जंगलात मुलगी आणि मुलाचे मृतदेह एकत्रच होते; तर वडिलांचा मृतदेह थोड्या दूर अंतरावर पडलेल्या अवस्थेत दिसला. तिन्ही मृतदेहाच्याजवळ आधारकार्ड सापडले. त्यामुळेच मयतांची ओळख पटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना तीन दिवसापूर्वीची असण्याची शक्यता आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी ए. डी. जहारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप तिडके, फौजदार गणेश चिते व पोलिस कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

admin

Read Previous

भापकर गेले, केंद्रेकर आले

Read Next

विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्ष कैद व दंडाची शिक्षा