त्या पोलिसांविरूध्द 302 चा गुन्हा

सोलापुर – केवळ टॅ्रक्टरच्या टेपचा आवाज का वाढवला म्हणुन ऊस तोड वाहतुक करणार्‍या मजुराला पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्या मजुराचा मृत्यु झाल्याची घटना काल माढा तालुक्यात घडली. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आक्रमक भुमिका घेतल्यामुळे अखेर त्या मारहाण करणार्‍या पोलिसां विरूध्द 302 चा गुन्हा दाखल होऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? असा संतप्त सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे. _

सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बबनरावजी शिंदे शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्यासाठी ऊसतोड वाहतुकीचे काम करणारा सोनगिरी ता.भुम, जि.उस्मानाबाद येथील प्रदिप कल्याण कुटे (वय 24) हा गरीब तरूण मजुर स्वतःच्या कुटुंबिया समवेत ऊसतोड करून तो स्वतःच्याच ट्रॅक्टरमधुन कारखान्याकडे घेवुन जात असतांना रविवार दि.04 नोव्हेंबर रोजी दुपारी मानेवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दशरथ कुंभार व दिपक क्षिरसागर या दोघांनी त्यास ट्रॅक्टरच्या टेपचा आवाज का वाढवला या क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यास माढा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा जागेवरच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.

सदर घटने प्रकरणी मयताच्या नातेवाईक व सोनगिरी ग्रामस्थांनी त्या पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करूनही पोलिस चाल ढकल करत होते. या घटनेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांना माहिती समजताच त्यांनी तातडीने संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक, डि.वाय.एस.पी यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सोलापुर ग्रामीणच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार करून त्या पोलिसां विरूध्द 302 चा गुन्हा दाखल करण्याची, त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः यात लक्ष घालुन या दोन्ही पोलिसां विरूध्द 302 चा गुन्हा दाखल करण्याच्या सुचना माढा पोलिसांना दिल्याने या पोलिसां विरूध्द गुन्हा दाखल झाला असुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ही करण्यात आली. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांचे इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी ही मुंडे यांनी लावुन धरल्याने मयताचे पुन्हा सोलापुरच्या रूग्णालयात इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सोेमवारी सायंकाळ पर्यंत सुरु होती.

दरम्यान सदर घटनेबाबत प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असुन, रक्षणकर्ते पोलिसच ऊसतोड मजुरांच्या जिवावर का उठले आहेत असा संतप्त सवाल केला आहे. ऊसतोड मजुरांना सरकार कोणत्याही सोई-सवलती, सुविधा देत नाही. ऊस तोड कामगार महामंडळाचाही पत्ता नाही, या मजुरांना साधी सुरक्षाही मिळु नये आणि पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यु व्हावा ही अतिशय दुर्देवी घटना असुन ऊस तोड मजुरांवर होणार्‍या या अन्यायाबद्दल आपण सरकारला जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले. या पोलिसांनी आवाज वाढवला म्हणुन नव्हे तर हप्ता वसुलीसाठी या मजुराच्या वाहनाला आडवले असा आरोप करून हा हप्ता त्या पोलिसांसाठी होता का ? वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसाठी असा सवाल उपस्थित करून या प्रकरणी अधिक सखोल चौकशी करून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.

admin

Read Previous

वेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या

Read Next

एस.पी.साहेब…