टीव्ही पाहणे झाले महाग !

उस्मानाबाद – जेवढे चॅनेल पाहता, तेवढ्याच चॅनेलचे पैसे द्यावे लागणार, असे सांगत ट्रायने डीटीएच ग्राहकांसाठी नवीन नियमावली लागू केली; पण यामुळे टीव्ही पाहणे महाग झाले आहे. यातून ग्राहकांचा नव्हे तर ब्रॉडकास्ट कंपन्या व सरकारचा मोठा फायदा झाला आहे.

ट्रायच्या नियमानुसार फ्री टू एअर चॅनेलसाठी 130 रुपये आणि जीएसटी असे 154 रुपये मोजावेच लागणार आहेत. त्यानंतरच आपल्या आवडीचे चॅनेल निवडता येणार आहेत; मात्र त्यावर शुल्काव्यतिरिक्त जीएसटीही द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता महिन्याकाठी टीव्हीवर किमान 450 ते 600 रुपये खर्च होत आहे. पूर्वी तो 250 ते 350 होता.

सध्या प्रत्येक ब्रॉडकास्ट कंपन्यांनी आपापले चॅनेल पॅक वेगवेगळ्या दरात उपलब्ध केले आहेत. त्यात एसडी आणि एचडी या चॅनेलला वेगवेगळे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. हे दर साधारणतः तीस रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. प्रति चॅनेलचे दर 10 पैशांपासून ते 19 रुपयांपर्यंत आहेत; परंतु या प्रत्येक चॅनेल व पॅकेजेसवर ट्रायने कर लावला आहे. तसेच जे चॅनेल पूर्वी मोफत दाखवण्यात येत होते, त्याला दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यात कित्येक चॅनेल लोकांच्या आवडीचे नाहीत; परंतु अशा चॅनेलचे पैसे ग्राहकांना इच्छा नसतानाही मोजावेच लागणार आहेत. पूर्वी तीनशे रुपयांना मिळणारा चॅनेलचा पॅक आता फ्री टू एअर चॅनेलचे दीडशे, जीएसटी कर लागून साडेचारशे रुपयांच्या पुढेच मिळत आहे.

पॅकेज निवडीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक कंपन्यांना फोन करीत आहेत. त्यामुळे कंपनीच्या हेल्पलाइन व्यस्त आहेत. फोन लागला तरी त्यांच्याकडून चॅनेल पॅकेजबाबत माहिती न देता वेबसाईटवर जाऊन चॅनेलची निवड करावी, असे सांगण्यात येत आहे; मात्र ग्रामीण भागातील अनेक ग्राहक इंटरनेटचा वापर करीत नाहीत. त्यामुळे चॅनेलची निवड करावी तरी कशी, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

admin

Read Previous

विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्ष कैद व दंडाची शिक्षा

Read Next

आनंदनगर पोलिसांची खातेनिहाय चौकशी होणार