एस.पी.साहेब…

उस्मानाबादचा स्त्री लंपट शिक्षणाधिकारी सचिन जगताप याच्यावर अखेर 16 एप्रिल रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी भूम तालुक्यातील आणखी एका महिलेने तक्रार दिली.
जगताप स्त्री लंपट असल्याचं उघड झाल्यानंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी जगतापच्या केबिनला चप्पलाचा हार घालून दरवाज्यावर शाई फेकली तर काल तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावात जगतापच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले.जगताप विरुद्ध जनक्षोभ वाढत चालला आहे. अनेक संघटना आणि व्यक्तीनी जिल्हाधिकारी आणि सीईओकडे निवेदन देवून निलंबित करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे जगतापला तात्काळ अटक करण्याची मागणी होत असताना, जगताप पोलिसांच्या हाती लागला नाही, मात्र दुसरीकडे जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून धडपड करीत आहे.जगताप कुठेतरी लपून बसला आहे आणि पोलिसांना त्याचा मागमूस लागत नाही, ही दुर्दैवी बाब आहे.हाच जगताप 10 एप्रिल रोजी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये ‘गात’ साहेबांसमोर बसून होता, तेव्हा अटक झाली असती तरी पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले नसते. पोलीस एकीकडे जगतापचा पाहुणचार करून सेटलमेंट करीत होते तर पीडितास 18 तास ताटकळत ठेवून अधिक पीडा देत होते.
जगतापचे गोडवे ‘गात’ बसणाऱ्या पोलीस निरीक्षक ‘गात’वर एसपी साहेबांनी अजून कसलीही कारवाई केली नाही, त्यांची गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तात्काळ उचलबांगडी करणे अपेक्षित होते, ते झाले नाही. मात्र एसपी साहेब, चौकशी अहवालाची वाट पहात बसले आहेत. एसपी साहेब रजेवर असताना, इटकळचे पत्रकार विलास पांढरेच्या मारहाण प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी एका दिवसात नळदुर्गचे सपोनि प्रल्हाद सूर्यवंशी यांची पोलीस मुख्यालयात बदली केली.या प्रकरणात वरून दबाब आला म्हणे.
मग असा दबाब शिक्षणाधिकारी जगतापच्या प्रकरणात का आला नाही? का होत नाही आनंदनगर पोलिसांवर कारवाई ? एस.पी.साहेब, कशाची वाट पहात आहेत ? आनंदनगर पोलिसांवर केव्हा कारवाई होणार, असे विचारले तर एस.पी. साहेब सांगतात, डीवायएसपी मोतीचंद राठोड यांच्याकडे चौकशी दिली आहे, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. हा वेळकाढूपणा नव्हे का ?

पीडित महिलेने एसपी साहेबांसमोर आनंदनगर पोलिसांच्या छळाचा पाढा वाचलेला आहे, तो पुरावा ग्राह्य नाही का ? उस्मानाबाद ग्रामीणचे सपोनि संभाजी पवार, बीडीडीएसहून पुण्यात बदलून गेलेले सपोनि डी.बी.शिंदे,मुरूमचे सपोनि मुस्तफा शेख यांना जसे पाठीशी पातले तसे आनंदनगर पोनि गात यांना पाठीशी घालणार का ? हाच विषय सध्या चर्चिला जातोय. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी यांनाही दोषी धरलं जातंय. मानेची त्या दिवशी सुट्टी होती,परंतु गात यांनी, मोठा गुन्हा दाखल करायचा आहे म्हणून मानेला पोलीस स्टेशनला बोलावून घेतले आणि त्यांची फुकट ‘मान’हानी झाली, गिरी म्हणतात, साहेब असताना मी काय बोलणार ? गात म्हणतात , पीडित महिलेने तक्रारच वापस घेतली. सर्वजण एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.

कोणत्याही महिलेची तक्रार आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत गुन्हा दाखल करावा असे निर्देश असताना 18 तास ताटकळत का बसवण्यात आले, पीडित महिलेला कसला दबाब टाकण्यात आला, पीडितास पाच लाखाची ऑफर कोणी दिली ?

तक्रारदार महिलेस आरोपीप्रमाणे आणि आरोपीस फिर्यादीप्रमाणे वागणूक देणारे आनंदनगर पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. एस.पी. साहेब, कारवाई करणार म्हणून सांगतात, पण ते पंचांग पाहून कारवाई करणार आहेत का ? कारण घटना घडून 12 दिवस तर गुन्हा दाखल होवून सात दिवस झाले आहेत.

उस्मानाबादच्या पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे, त्यात आनंदनगर पोलिसांनी तर कहर केला आहे.एसपी साहेबांची एप्रिल अखेर बदली अपेक्षित आहे, जाता जाता तरी आनंदनगर पोलिसांवर कठोर कारवाई करून एसपी साहेब आपली प्रतिमा उजळ करणार का ? हाच प्रश्न आता उरलेला आहे.

– सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
9420477111

admin

Read Previous

त्या पोलिसांविरूध्द 302 चा गुन्हा

Read Next

पोलीस स्टेशन चकाचक… कारभार मात्र भंगार !