उस्मानाबाद : ऑक्सिजन बंद केल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

 
कोरोनाग्रस्ताचा मृत्यूपूर्व व्हिडिओ व्हायरल 

उस्मानाबाद : ऑक्सिजन बंद  केल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

उस्मानाबाद  - परंडा तालुक्यातील आसू येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी (दि.५) पहाटे जिल्हा रुग्णालयातील काेविड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु, त्याने मृत्यूपूर्वी स्वत:च्या मोबाइलमध्ये अर्धा ते एक मिनिटांचे दोन ते तीन व्हिडिओ बनवून भावाला पाठवत उपचारादरम्यान डॉक्टर येत नाहीत, रात्री ऑक्सिजन बंद करतात, कोणीच लक्ष देत नाहीत, असा आरोप केल्याने कोविड रुग्णावरील आरोग्य विभागाच्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





आसू येथील चालक असलेल्या एकाला २५ जून रोजी तापेचा त्रास होत असल्याने प्रथम परंडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, ताप कमी होत नसल्याने दुसऱ्या दिवशी बार्शीच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी घेण्यात आलेल्या स्वॅबचे रिपोर्ट २९ जून रोजी पॉझिटीव्ह आल्याने त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर श्वसनाचा त्रास होत असल्याने या रुग्णास १ जुलै रोजी उस्मानाबादच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, येथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे मृत्यू झाला. परंतु, तत्पूर्वी दि.२ व ३ जुलै रोजी या रुग्णाने त्याच्या भावास व्हाॅटसअॅपद्वारे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधिताचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मृताने उपचारादरम्यान भावाला पाठविलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये अशा प्रकारचे आरोप प्रशासनावर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

आसू (ता. परंडा) येथील एकाला निमोनियाच्या कारणावरून बार्शी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने त्याला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना रविवारी (ता. पाच) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मृताच्या भावाने सांगितले, की माझा भाऊ उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात ३० जूनला दाखल झाला होता.मात्र कोणीही दखल घेतली नाही.


भावाने दिलेल्या माहितीनंतर मी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना फोन करून हा प्रकार सांगितला. खासदारांच्या सूचनेनंतर प्रशासनाने उपचार सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री ऑक्सीजन सुरू नव्हता. तसेच डॉक्टरही नसल्याचे भावाने सांगितले. त्यामुळे पुन्हा मी खासदारांना पहाटे तीन वाजता फोन लावून माहिती दिली.खासदारांनी प्रशासनाला पुन्हा सांगितल्यानंतर ऑक्सीजन सुरु केला. मात्र त्यानंतर पुन्हा तीन चार दिवस रात्रीच्या वेळी माझ्या भावाला ऑक्सीजन पुरवठा झाला नाही. अखेर रविवारी (ता. पाच) पहाटे भावाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.


उपचारातील हलगर्जीपणामुळे आमच्यासोबत असे घडले. इतर कुणासोबत असे घडू नये. काय प्रकार आहे, ते कळत नाही. मात्र ऑक्सिजन दिला नाही. त्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाला. 

- मृताचा भाऊ 


ऑक्सिजन दिला होतासदरील रुग्ण बार्शी येथून उस्मानाबादला रेफर केले होते. त्या रुग्णावर आवश्यक ते उपचार करण्यात येत होते. ऑक्सिजनही देण्यात आलेला आहे. परंतु, या रुग्णाकडून उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. यातच त्याचा मृत्यू झाला. उपचाराबाबतचे रेकॉर्डही उपलब्ध असून तो व्हिडिओ कुठला याबाबतही थोडा संभ्रम आहे.
 -डॉ. आर. व्ही. गलांडे, सीएस

From around the web