मयत महिलेच्या आत्माला शांती लाभावी म्हणून सहा वर्षाच्या मुलाचा नरबळी

 


दोन मांत्रिकासह सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा 


 मयत महिलेच्या आत्माला शांती लाभावी म्हणून सहा वर्षाच्या मुलाचा नरबळी


उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील पिंपळगाव ( डोळा ) येथील एका सहा वर्षाच्या मुलाचा खून करून नरबळी दिल्याप्रकणी सहा आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल जिल्हा व सत्र  न्यायधीश १ एम.जी. देशपांडे यांनी सुनावली. 


एका आरोपीच्या मयत पत्नीच्या आत्माला शांती मिळावी आणि तिचा आत्मा भटकू नये म्हणून पुण्याच्या दोन मांत्रिकाच्या सांगण्यावरून सहा  वर्षाच्या कृष्णा गोरोबा  इंगोले या मुलाचा निर्घृण खून करून नरबळी देण्यात आला होता. या प्रकरणी  सहा आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 


26 जानेवारी २०१७ ला 6 वर्षांच्या कृष्णा इंगोले या बालकाचा कळंब तालुक्यातल्या डोळा पिंपळगावात खून झाल्याचं समोर आलं होतं. 26 जानेवारीला कृष्णा झेंडावंदनसाठी शाळेत गेला होता मात्र तो घरी परतलाच नाही. नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली असता घराशेजारच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. अत्यंत अघोरी पद्धतीनं कृष्णाचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं होतं.


विशेष म्हणजे 26 जानेवारीला अमावस्या होती आणि कृष्णाचा खून ज्या पद्धतीनं झाला ते पाहता हा खून अंधश्रद्धेच्या प्रकारातून झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय होता. पोलिसांनी त्या दिशेनं तपास केला असता आरोपी हे मृत कृष्णा इंगोलेचे नातेवाईकच असल्याचं समोर आलं. पुण्यातील लखन उर्फ राहुल चुडावकर या तांत्रिक बाबाच्या सहाय्यानं कृष्णाचा नरबळी देऊन खून केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली होती. .



घरातील महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा आत्मा भटकत असल्यामुळे घरात समस्या आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून या मृत महिलेची समाधी बांधून या समाधीच्या बांधकामावर मुलाचे रक्त टाकून नरबळी द्या, म्हणजे समस्या सुटेल असा दावा मांत्रिकानं केला होता.  


कळंब गु.र.क्र. 25 / 2017 मधील कृष्णा गोरोबा इंगोले या बालकाच्या खुनाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक- श्री सुनिल नेवसे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 31 / 2017 ची सुनावनी उस्मानाबाद सत्र न्यायालय क्र.- 1 श्री. एम.जी. देशपांडे यांच्या समोर झाली. यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ते श्री. एस.एस. सुर्यवंशी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. यातून सदर खटल्याचा निकाल आज दि. 23.10.2020 रोजी जाहिर होउन आरोपी- 1) उत्तम भिवाजी इंगोले, वय 50 वर्षे 2) उर्मीला उत्तम इंगोले 3) लखन श्रीरंग चावडेकर उर्फ राहुल 4) लक्ष्मी बाबु पोळ उर्फ द्रौपदी 5) साहेबराव प्रल्हाद इंगोले 6) सुवर्णा दिपक भडाले, सर्व रा. पिंपळगांव (डोळा), ता. कळंब यांना भारतीय दंड संहीता कलम- 34, 120 (ब), 302, 363, 364 सह महाराष्ट्र नरबळी, अमानवी, अघोरी कृती व काळा जादू प्रतिबंधक कायदा कलम- 3 (2) च्या अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात येउन खालील शिक्षा सुनावन्यात आल्या.-


            वरील सर्व आरोपींना भा.दं.सं. कलम- 302, 34 च्या अपराधाबद्दल आजन्म कारावासासह प्रत्येकी 3,000 ₹ दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त साधा कारावास.


            भा.दं.सं. कलम- 363, 34 च्या अपराधाबद्दल 7 वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी 2,000 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त साधा कारावास.


            भा.दं.सं. कलम- 364, 34 च्या अपराधाबद्दल आजन्म कारावासाची व प्रत्येकी 3,000 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त साधा कारावास.


            महाराष्ट्र नरबळी, अमानवी, अघोरी कृती व काळा जादू प्रतिबंधक कायदा कलम- 3 (2) च्या अपराधाबद्दल 7 वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी 2,000 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त साधा कारावास. अशा शिक्षा सुनावल्या असुन या सर्व शिक्षा आरोपींनी समवर्तीपणे (एकाच वेळी) भोगायच्या आहेत. ठोठावण्यात आलेल्या एकुण 60,000 ₹ दंडा पैकी 30,000 ₹ रक्कम ही मयत बालक- कृष्णा याचे आई- वडील सारिका व गोरोबा इंगोले यांना नुकसानभरपाई म्हणुन दिली जाणार आहे.









From around the web